स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?
स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?sakal

स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

जगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा
Published on

-सुधा हुजूरबाजार तुंबे

परंपरा, रूढी पुढच्या पिढीसाठी वारसा आहेत, हे मान्य आहे... पण त्यांच्या बेड्यांत अडकून मागासलेल्या विचारांच्या दलदलीत फसता कामा नये. जगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा. मिळालेले स्वातंत्र्य कसे टिकविता येईल, याचाही विचार करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

अहमदाबादला मुलाच्या घरी पुस्तकांची कपाटंच्या कपाटं भरलेली आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आधारित जगभरातली भरपूर पुस्तकं वाचायला मिळतात. तिथेच मला मसिह अलिनेजडचे ‘विंड इन माय हेअर’ हे पुस्तक दिसले. सूनबाईंनी तोंडभरून कौतुक केलेले हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ उलगडत गेला... इराणमध्ये राहणारी स्त्री हिजाबाशिवाय घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर चालताना वाऱ्यावर उडणारे केस ही एक आख्यायिका वाटते. कधीतरी केसावरचा हिजाबाचा भार खाली पडून केसांना वाऱ्याची संगत लाभून इतरत्र विखरतील आणि नाजूक हातांनी ते केस सावरत उडणारा स्कर्ट सांभाळत समुद्राच्या कडेने भरगर्दीत चालण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हे त्यांचे स्वप्न आहे.

एकेकाळी इराण हा अतिशय प्रगत विचारसरणी असलेला देश होता. माझ्या भारतीय मैत्रिणीची आई तेहरानच्या रस्त्यावर साडी नेसून बाहेर जाताना, स्कर्ट घालून स्टायलिशपणाने बाहेर वावरणारा इराणी महिलावर्ग बघून थक्क होत असे. आज त्या वयोवृद्ध मातेला इराणी तरुण मुली फोटोत, टी.व्हीवर हिजाबाशिवाय दिसत नसल्याने खूप वाईट वाटते. इराणमध्ये महिलांनी व्यक्तिस्वातंत्र्य ग्राह्य धरलं होतं आणि अचानक त्यांना भली मोठी किंमत मोजावी लागते आहे. हे पुस्तक वाचून तसेच जगभरातील मुसलमान स्त्रियांचे अनुभव बघून-वाचून मला स्वातंत्र्याची व्याख्या ही केवळ राष्ट्रापुरती मर्यादित नसून व्यक्तिगतही आहे, असे समजले.

स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?
200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. आज जवळ जवळ पंचाहत्तर वर्षांनी आपण खरंच सर्वतोपरी स्वातंत्र्य अनुभवतोय का? लोकशाही असली तरी मनातले खरे विचार उघड करण्यास कचरतो. अगदी लहान वयापासून शाळा, मित्र, खेळ, अभ्यास हे आईवडिलांच्या मनाप्रमाणे घडते. मुलांना स्वातंत्र्य असते का?... अभ्यासक्रमात विषय निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. अगदी हल्लीची मोजकी महाविद्यालये सोडली तर बाकी ठिकाणी आर्ट्‌स, सायन्स आणि कॉमर्स असे ठोस अभ्यासक्रम असतात. सायन्सला जाणारा विद्यार्थी आवड असूनही इतिहास शिकू शकत नाही, तसेच कॉमर्सचा विद्यार्थी रसायनशास्त्र इच्छा असूनही शिकू शकत नाही.

स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?
अजिंक्य पंजशीर

लग्नानंतरही महिलांना नोकरी, घरकाम, संसार ह्यातून आपली आवडती कला जोपासण्याचे स्वातंत्र्य असतेच असे नाही. कित्येकदा उच्चशिक्षित महिलांना लग्नानंतर सासरी स्वातंत्र्य नसल्याने आपल्या करिअरची आहुती द्यावी लागते. धर्म, जात, वर्ण हे आजही समाजात अस्तित्वात आहेत. केवळ धर्माचा आधार घेऊन कित्येकदा अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य हिरावले जाते. जातीच्या आधारावर खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य गमावले जाते. स्वातंत्र्य असले तरी संधींची उपलब्धता असेलच असेही नसते. पैशाच्या पाठबळाअभावी संधी येऊनही स्वप्ने साकार होत नाहीत. त्यातही घरात मुलगा-मुलगी असा फरक अजूनही केला जातो. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी मुलीला संधी आली तरी तो पैसा मुलाच्या उच्चशिक्षणासाठी वापरला जातो. मुलींच्या उच्चशिक्षणाचे स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जातं हे समाजातील विदारक सत्य आहे. स्वातंत्र्य आणि मुक्ती हे सारखे वाटतात पण आजच्या स्वतंत्र भारतातही वैद्यकीय सोयींचा अभाव असल्यामुळे कित्येक रोग अजूनही उद्‌भवतात. कित्येक रोगांपासून आपली मुक्ती अद्यापही स्वच्छता तसेच सांडपाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे झालेली नाही. आम्ही आमची अहमदाबादची ट्रीप तिथे चिकनगुनिया आणि डेंगूचा प्रादुर्भाव झाल्याने नुकतीच रद्द केली. हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य असूनही केवळ रोगराईच्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्य गमावले अशी भावना निर्माण झाली. कोरोनामुक्त भारत हे प्रयत्न चालू असताना आलेल्या या इतर साथी आपले स्वातंत्र्य हिरावून नेत आहेत.

स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?
ज्ञानेश्वरीतील शिक्षण पद्धतीतून घडू शकतील संशोधक

वयस्कर व्यक्तीही वयोमानानुसार परावलंबी होतात. कोरियात रहाताना तेथील वयस्कर व्यक्तींना स्वतंत्रपणे आनंदाने जगता येण्याच्या दृष्टीने असलेल्या सोयी आठवल्या की त्या भारतातील आपल्या वयस्कर नागरिकांना उपलब्ध कशा करून देता येतील? असा विचार सतत मनात येतो. इमारतीतील तसेच रस्त्यावरील जिन्याच्या बाजूला असलेली रॅम्पची सोय, आवाज करणारे सिग्नल्स, रेल्वेत तसेच बसमध्ये चढण्याच्या दृष्टीने केलेल्या सोई, ठिकठिकाणी असलेल्या ग्लोबल सेंटरमधील विविध उपक्रम, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, स्वयंसेवकांची उपलब्धता बघताना भारतातील परावलंबी वयस्कर व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे कधी जगू शकतील? असा प्रश्न पडतो. मिळालेले स्वातंत्र्य हे जबाबदारपणे स्वतःच्या तसेच समाजाच्या, देशाच्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी, रक्षणासाठी वापरले नाही तर कालचक्राची दिशा बदलायला वेळ लागणार नाही.

स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?
केवळ महाराष्ट्रात आढळते हे झाड; 170 वर्षांपूर्वी अस्तित्वाचे पुरावे

अगदी शंभर वर्षांपूर्वी भारतात पारतंत्र्य असतानाही स्त्रीशिक्षणाचा पाया महिलांच्या उत्कर्षासाठी घातला गेला. आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्या चळवळीचे स्मरण करून मिळालेले व्यक्तिस्वातंत्र्य कसे जोपासायला हवे, हा विचार प्रत्येक भारतीयाने विशेषतः महिलांनी करायला हवा. परंपरा, रूढी पुढच्या पिढीसाठी वारसा आहेत, हे मान्य आहे... पण त्यांच्या बेड्यांत अडकून मागासलेल्या विचारांच्या दलदलीत फसून कर्माला दोष देण्यापेक्षा जगभरातील घटना बघून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून त्याचा सन्मान करून ते कसे टिकविता येईल, याचा विचार करणे ही आजची गरज आहे. ‘संपूर्ण चातुर्मास’या पुस्तकात म्हणतात नं... ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको...’ श्रावणातला आजचा आपला वसा आहे... मिळालेल्या स्वातंत्र्याचा वसा!

(सुधा तुंबे या विशेष शिक्षक प्रशिक्षक आणि जीवनानुभव लेखिका आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()