सर्वांचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप व त्यांचे ‘एनडीए’तील मित्रपक्ष मिळून २९३ जागी विजयी झाले. ओडिशामधील निर्विवाद विजय आणि पाठोपाठ उत्तर प्रदेशात बसलेला धक्का पाहून ‘कहीं दीप जले, कहीं दिल’ अशी अवस्था जरी झाली असली तरी ते सरकार स्थापन करू शकतात; पण तरीही निकालाच्या दिवशी शेअर बाजाराचे सर्व निर्देशांक ३ ते ८ टक्के कोसळले. मात्र, नंतर लगेच दुसऱ्या दिवशी सावरले. भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने भांडवली बाजार निराश झाला. आता पुढे काय करायचे, हा प्रश्न असंख्य गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे.
प्रथम आत्मचिंतन करून आपण एक दिवसाचे गुंतवणूकदार आहोत, की भारताच्या भविष्यावर विश्वास ठेवून किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक करीत आहोत, हे ठरवावे. दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदाराला कोणतीही भीती नाही. शेअर बाजार वाजवी किमतीच्या जवळ आला आहे. येथे गुंतवणूक केलीच/वाढवलीच पाहिजे, तसेच ‘एसआयपी’द्वारे केलेल्या गुंतवणुकीला कोणतेही भय नाही. हेही दिवस जातील, हे लक्षात ठेवावे.