रितेश मुथियान, श्रीनिवास जाखोटिया
global.finvest@gmail.com
कोरोना महासाथीच्या काळात आणि त्यानंतर अनेक नवे गुंतवणूकदार शेअर बाजारात आले. मागील चार वर्षांत त्यांनी मोठी तेजी पाहिली; पण मोठी पडझड अनुभवली नाही.
अनेकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा ‘डे-ट्रेडिंग’; त्यातही वायदे बाजार म्हणजे ‘फ्युचर्स अँड ऑप्शन्स’कडे अधिक भर देत मोठे नुकसान सोसले. मुळात वायदे बाजार ‘फ्युचर्स अँड ऑप्शन्स’ हा सट्टाच आहे व त्यात बहुतांश वेळा नुकसानच होते.
सुमारे ९० टक्के लोक हे ‘फ्युचर्स अँड ऑप्शन्स’मध्ये नुकसान सोसतात. त्याबाबत भांडवल बाजार नियामक ‘सेबी’द्वारे वारंवार सूचनाही दिली जाते; तसेच ‘सेबी’ने याचे नियमही कठोर केले आहेत, तरीही लोकांचा कल ‘इझी मनी’साठी ‘फ्युचर्स अँड ऑप्शन्स’कडेच असतो.
ऑनलाइन ब्रोकिंग सुविधेमुळे लोकांचे शेअर खरेदी-विक्रीसाठी खाते उघडणे एकदम सोपे झाले असले, तरी बाजारात पैसे कमावणे हे खाते उघडण्याएवढे सोपे नाही. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक लाभदायी ठरते.