कोणत्याही अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी एखादा देश पायाभूत सुविधांत किती गुंतवणूक करतो, हे अत्यंत निर्णायक असते. पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती होतेच; पण त्याचा गुणक प्रभाव हा जास्त परिणामकारक असतो.
अर्थव्यवस्थेतील मागणी व पुरवठा या दोघांना चालना देण्याचे काम ही गुंतवणूक करत असते. अमेरिका पुढारलेला देश आहे म्हणून तेथील रस्त्यांचे जाळे चांगले आहे, की रस्त्यांचे जाळे कार्यक्षम असल्यामुळे तो देश ही प्रगती करू शकला, हा प्रश्न पूर्वी अमेरिकेच्या एका अध्यक्षांनी चर्चिला होता. उत्तर अर्थात, चांगले, कार्यक्षम रस्ते हेच देशाची प्रगती करू शकतात हेच आहे.