डॉ. अनंत सरदेशमुख
भारताच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणात सेमीकंडक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सेमीकंडक्टर अर्थात सिलिकॉन चिपच्या उत्पादनासाठी राष्ट्रीय धोरण केंद्र सरकारने आखले आहे. तैवान हा भौगोलिकदृष्ट्या लहान; पण सेमीकंडक्टर क्षेत्रातील मोठा उत्पादक देश आहे.
जगातील बहुतांश देशांचा तो पुरवठादार आहे. जागतिक बाजारपेठेतल्या सेमीकंडक्टरच्या वाढत्या मागणीची पूर्तता भारत नक्कीच करू शकतो.
सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी स्थिर वातावरण, बौद्धिकसंपदा अधिकारांच्या संरक्षणासह धोरणात्मक चौकट वाढविण्याची गरज आहे. तेव्हाच या क्षेत्रातला भारताचा अत्यल्प वाटा भविष्यात वाढू शकतो आणि मोठ्या संधीचा पुरेपूर लाभ घेता येऊ शकतो.
चीनच्या आग्नेय दिशेला असलेला, अवघी अडीच कोटी लोकसंख्या असलेला एक चिमुकला देश, ज्याला १९४९ पासून गिळकृंत करण्याची चीनची मनीषा आजही साध्य होऊ शकलेली नाही.
या टीचभर देशाकडे असे कोणते सामर्थ्य आहे, ज्यामुळे चीनसारखा देश त्याला हात लावू शकत नाही. एवढेच नव्हे, तर अमेरिकेसारखा बलाढ्य देशालाही हा देश गुंतवून ठेवतो आहे.
हा देश म्हणजे तैवान आणि या देशाकडे आहे एक अभेद्य कवच ‘सिलिकॉन शिल्ड’चे. त्याचे सामर्थ्य म्हणजे ‘सेमीकंडक्टर’!