इराणमधल्या एका कॉलेज विद्यार्थिनीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये ती केवळ अंतर्वस्त्रांवर कॉलेजच्या आवारात फिरताना दिसते आहे. जगभरातल्या माध्यमांनी या घटनेची दखल घेतली आहे.
इराणध्ये महिलांसाठी अत्यंत कर्मठ नियम आहेत. त्यातलाच एक म्हणजे ड्रेसकोडचा. तिथल्या महिलांनी याआधीसुद्धा याविषयी बंड केले आहे, आंदोलनं केली आहेत.
या घटनेदरम्यान बासिज या तथाकथित संस्कृतीरक्षक निमलष्करी दलाने या विद्यार्थिनीचे कपडे इस्लामिक नियमानुसार नसल्याच्या कारणावरुन तिला हटकले. विद्यार्थिनीने हुज्जत घातल्यानंतर या दलाने तिचे कपडे फाडले तसेच तिचा हिजाबही ओढून काढला.
त्यामुळे संतापून, हताश होऊन या तरुणीने सगळेच कपडे काढून टाकले आणि अंतर्वस्त्रांवर फिरत या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला.
तेहरान इथल्या अत्यंत प्रतिष्ठीत अशा इस्लामिक आझाद विद्यापीठात ही घटना घडली आहे.