Sucheta Dalal Tweet
Sucheta Dalal TweetSakal

‘एक ट्वीट की कीमत तुम क्या जानो...’

Published on

भूषण महाजन

हर्षद मेहता प्रकरण उजेडात आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी केलेले एक ‘ट्वीट’ १२ जूनपासूनच समाज माध्यमात फिरत होते. ‘कुणीतरी जुनाच शेअर ऑपरेटर परदेशी गुंतवणूकदारांना हाताशी धरून एका उद्योग समूहाच्या शेअरचे भाव वाढवत आहे की काय?,’ असे कोणत्याही कंपनीचे नाव न घेता केलेले हे ‘ट्वीट’... पण त्यामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. ‘ट्वीट’च्या पाठोपाठ सोमवारी वृत्तपत्रांत बातमी आली, की अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी कंपन्यांचे डीमॅट खाते व निधी खाते ‘एनएसडीएल’ने गोठवले. पुढे अफवांची त्सुनामीच आली.

बाजाराने त्याचा संबंध एकमेकांशी जोडून अदानी समूहाच्या शेअरची बेफाम विक्री केली व त्या समूहाच्या सर्वच शेअरना ‘लोअर सर्कीट’ लागले. दरम्यान, ‘एनएसडीएल’ने खुलासा केला, की कोणतेही खाते नव्याने गोठवलेले नाही. जी खाती गोठवली आहेत, ती तांत्रिक कारणांमुळे २०१६ पासूनच गोठवलेली आहेत. मग, पुन्हा भाव वाढू लागले. पण सप्ताहाअंती अदानींची मालमत्ता कागदावर १२०० कोटी डॉलरने कमी झाली. मात्र, त्यात हात पोळले ते पळत्याच्या पाठीमागे लागलेल्या छोट्या गुंतवणूकदारांचे!

अदानी समूहातील शेअरचा विचार करता, अदानी एंटरप्रायझेस गेल्या वर्षभरात ९०० टक्के, तर अदानी ट्रान्समिशन ७०० टक्के आणि अदानी टोटल गॅस १००० टक्क्यांनी वाढले. ही वाढ पचायला अविश्वसनीय व जडच होती. तिला नावे ठेवणाऱ्या अभ्यासकांचे म्हणणे काय ते बघूया.

- शेअरमागे मिळकतीच्या २०० पट भाव असलेला एंटरप्रायझेस, १५० पट भाव असलेला अदानी ट्रान्समिशन आणि तब्बल २६९ पट भाव असलेला अदानी टोटल गॅस फार काळ या भावापातळीवर टिकणार नाहीत. मिळकत तरी वाढायला हवी किंवा भाव तरी खाली यायला हवेत.

- समूहाच्या प्रत्येकच उद्योगात प्रवर्तकांचा वाटा ७४ टक्के, तर परदेशी गुंतवणूकदार २० ते २४ टक्के असल्यामुळे जनतेकडे असलेले शेअर जेमतेम ४-५ टक्के आहेत. त्यामुळे त्यात भावचलाखी करणे सोपे आहे.

- म्युच्युअल फंडाकडे गुंतवणुकीचा भाग म्हणून फारसे शेअर नाहीत. अनेक फंडांकडे अदानी एंटरप्रायझेसचे शेअर आहेत, पण ते ‘आर्बिट्राज’ कॅटेगिरीत आहेत. त्यात फंडांनी खरेदीसमोर विक्रीही केली आहे.

- तब्बल ७५०० कोटी डॉलरची मालमत्ता निर्माण केलेल्या या समूहाच्या शेअरचे विश्लेषक अत्यल्प आहेत. त्यामुळेच त्यांच्या खरेदी किंवा विक्रीची शिफारस कोणीही केलेली नाही.

कंपनीचे व तिच्या निष्ठावान गुंतवणूकदारांचे काय म्हणणे आहे, तेही बघूया :

- शेअरचे भाव जरी आकाशाला भिडलेले असले तरी त्यामागे मजबूत कामगिरी आहे. ‘अदानी ट्रान्समिशन’चा नफा ६०० कोटी रुपयांवरून १२०० कोटींवर जाऊन येत्या वर्षात ४६०० कोटींवर जाईल.

- ‘अदानी पॉवर’ची विद्युतनिर्मिती ५०० मेगावॉटवरून ३ गिगावॉटवर गेली आहे व पुढे २५ गिगावॉटचे लक्ष्य आहे. शेअर बाजार भविष्याकडे बघत असल्यामुळे हे भाव कमीच आहेत.

- अदानी समूहातील शेअरमध्ये टोटल, ब्लॅकरॉक व इतरही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी भांडवल घातले आहे व तेही चढ्या भावात! त्यांनी पुरेशी दक्षता (ड्यु डिलिजन्स) घेतली असल्याशिवाय ४० ते ५० हजार कोटी रुपये गुंतवतील, असे म्हणणे चुकीचे आहे. याच पद्धतीने ‘रिलायन्स’ने देखील ‘जिओ प्लॅटफॉर्म’साठी जगभरून भांडवल जमा केलेच होते.

- पायाभूत सुविधा व हरित ऊर्जा क्षेत्रातील या महाप्रचंड उद्योगसमूहाचे मानांकन हे देशाच्या ‘सॉव्हरिन’ मानांकनाच्या बरोबर आहे.

- ‘अदानी पोर्ट’कडे देशातील बंदरे व विमानतळांचा ६० टक्क्यांवर हिस्सा आहे व तो पुढे वाढतच जाणार आहे.

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘एमएससीआय इंडिया इंडेक्स’मध्ये अदानी समूहातील तीन शेअर- अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस व अदानी ट्रान्समिशन हे २७ मे पासून समाविष्ट केले आहेत. परदेशी गुंतवणूकदार सहसा ‘एमएससीआय इंडिया इंडेक्स’ बघूनच आपली भारतातील गुंतवणूक कमी-अधिक करत असतात. खालच्या भावात वरील तीनही शेअरमध्ये नवी गुंतवणूक येऊ शकते.

आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, ते बघूया.

- या समूहाच्या शेअरची मालकी उर्वरित बाजारात अत्यल्प असल्यामुळे त्यात मोठा चढ-उतार होऊ शकतो, याची मनात पक्की खूणगाठ बांधावी.

- सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजितो दात; असे साहस अंगी असेल तरच या शेअरमध्ये हात घालावा. यासाठी किमानपक्षी आपले खिसे मोठे व जड असले पाहिजेत. थोडक्यात आर्थिक व मानसिक जोखीमक्षमता हवी. किमान २० टक्के वध-घटीची तयारी, तसेच तोट्याची तयारी असेल तरच नफा मिळविता येईल.

- त्यातल्या त्यात ‘अदानी पोर्ट’ हा शेअर, समूहातील इतर शेअरसारखा दुडक्या चालीने वर जात नाही. बऱ्याच विश्लेषकांनी संशोधित केलेला हा शेअर मोठा ‘स्टॉपलॉस’ ठेऊन अभ्यासता येईल. ६९८ रुपयांचा शुक्रवारचा बंद भाव आहे. या भावाला १०० रुपयांचा तोटा सहन करायची तयारी हवी; अन्यथा ६०० ते ६२० रुपयांच्या आसपास तो आकर्षक वाटतो. जुना ८४० चा भाव मिळू शकतो. त्याचप्रमाणे, ‘अदानी एंटरप्रायझेस’चा शुक्रवारचा बंद भाव १४८७ रुपये होता. धाडसी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विचार करता, तो १६०० रुपयांच्या उद्दिष्टासाठी चांगला वाटतो.

(लेखक ‘अर्थबोध शेअर्स’चे संचालक आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...