ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर १६ वर्षीय नेमबाज पार्थ माने याने प्रशिक्षक सुमा शिरूर यांना काय विचारलं असेल तर एक निरागस प्रश्न.
‘‘मॅडम मी आता सीनियर स्पर्धेत खेळू शकतो ना?’’
त्याच्या या प्रश्नाचं आणि त्यामागच्या इच्छेचं कौतुक करत सुमा शिरुर सांगत असतात.
जत्रेतील खेळण्याच्या बंदुकीपासून सुरू झालेला प्रवास, लॉकडाऊनमध्ये घरातच कम्पाऊंड वॉल वाढवून बांबूंच्या सहाय्याने तयार केलेली शूटींग रेंज ते वर्ल्ड चॅम्पियन... मागील ४-५ वर्षांत सोलापूरच्या पार्थने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळवलेले यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
अगदी लहान वयात आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्याने सोलापूर-पुणे-पनवेल असा प्रवास केला. विषेश म्हणजे त्याने ISSF Junior World Championship स्पर्धेत सहभागी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता व्हिक्टर लिंडग्रेन ( स्वीडन) आणि ज्युनियर आशियाई चॅम्पियन हुआंग लिवान्लीन ( चीन) या तगड्या स्पर्धकांचा पराभव करून सर्वांना थक्क केले.