लाखो वर्षांपूर्वी भूगर्भात हजारो-लाखो वनस्पती, सुक्ष्म प्राणी हळूहळू गाडले गेले. आज जे पेट्रोल-डिझेल आपल्याला मिळते, ते सर्व भूगर्भातून (जीवाश्म इंधन) मिळते. ते सर्व या प्राणी, वनस्पतीच्या जीवाश्माच्या रुपात मिळते. डायनोसॉर, कितीतरी प्राणी, वनस्पती, सुक्ष्मजीव नष्ट झाले. पिरॅमिड तयार करणारे कारागिर, रोमन साम्राज्य, ॲझटेक, माया, सिंधू संस्कृती ही विलूप्त होत गेली. कितीतरी गावे, वस्त्या, मानवी संस्कृतीनी उभी केलेली आश्चर्येसुद्धा मातीमोल झाली; मात्र या संस्कृतीचे अवशेष, प्राण्याचा सांगाडा, एखाद्या संस्कृतीतील वीटेचा भाजलेला तुकडा उत्खणनात मिळतो. जगभरात अनेक ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खणन करुन गाडली गेलेली संस्कृती, फळे, फुलांचे, प्राण्यांच अवशेष बाहेर काढले. यातून पूर्वीची संस्कृती कशी होती, याचा वेध घेतला. अगदी तशाच पद्धतीने आजच्या आधुनिक जगातील मोठी शहरे, गावे जमिनदोस्त होतील का? समजा ही शहरे काही कारणांनी जमिनित गाडली गेली तर हजारो वर्षानंतर या शहरांचे अवशेष कसे दिसतील? त्या काळातील पुरातत्वसंशोधक आजच्या संस्कृतीचा वेध कसा घेतील, असे प्रश्न संशोधकांना पडले आहेत.
आज असलेल्या शहरातील प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम, काच, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे आदी अवशेषांवर ते संशोधन करतील. आपली संस्कृती कालांतराने प्लास्टिक, खणीकाम, कॉंक्रिटमध्ये दफन होत जाईल. वॉशिंग्टन, पॅरिस, न्युयॉर्क, शांघाय, इंग्लंड, टोकियो, मुंबई, दिल्ली ही अजस्त्र शहरेसुद्धा कालांतराने नष्ट होण्याच्या मार्गाला लागतील. कारण काहीही असेल. जसे की, समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल, आकाशातून एखादी अश्नी पृथ्वीवर पडेल, भूकंप होईल, पृथ्वीच्या पोटातून लाव्हारस बाहेर पडेल, अतिवृष्टी होईल, दुष्काळ पडेल, रोगराई उत्पन्न होईल. यापैकी काहीही होईल. तेव्हा आपली शहरेसुद्धा डायनोसॉरप्रमाणे जीवश्मात रुपांतरीत होतील. संस्कृतीचा उदय अन् विनाश, होय, ही प्रक्रिया आजही सुरु आहे.