स्टीव्ह जॉब्स यांचा एक मेल आणि कंपनीची उलाढाल पोहोचली 2 ट्रिलियनवर
ios स्टीव्ह जॉब्स ! 'स्टीव्ह जॉब्स' हे नाव ऐकल्यावर, वाचल्यावर किंवा त्यांचा फोटो ओझरता जरी आपल्या डोळ्यासमोरून गेला तरी आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर कायम वाटतो. त्यांना पाहून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते असं म्हंटल तर अजिबात वावगं ठरणार नाही. स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या निर्णय क्षमतेवर, अॅपल कंपनीला जगभरातील एक प्रीमियम ब्रँड तर बनवलाच. पण काळानुरूप केलेले विविध बदल आणि गुणवत्तेच्या जोरावर आज अॅपल कंपनी यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करतेय. दिवसेंदिवस अॅपलच्या ग्राहकांमध्ये वाढ देखील होतेय. आज या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण स्टीव्ह जॉब्स यांच्याबद्दलची एक अनोखी कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही कुठेही वाचलं नसेल. हा लेख आहे स्टीव्ह जॉब्स यांना आलेल्या एका ई-मेल चा आणि त्यावरील जॉब्स यांच्या उत्तराचा अर्थात रिप्लायचा. जॉब्स यांच्या अचूक निर्णयामुळेअॅपलसारखी कंपनी आज थेट 2 ट्रिलियनचं भांडवल असणारी बलाढ्य कंपनी म्हणून जगभरात नावारूपास आली आहे.
स्टीव्ह जॉब्स यांचं संपूर्ण नाव स्टीफन पॉल जॉब्स. स्टीव्ह यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 24 फेब्रुवारी 1955 रोजी झाला. जॉब्स हे सॅन फ्रान्सिस्कोमध्येच लहानाचे मोठे झाले. जॉब्स हे रीड महाविद्यालयाचे विद्यार्थी, 1972 मध्ये ते याच कॉलेजचे ड्रॉपआउट देखील राहिले आहेत. जॉब्स यांनी 1974 मध्ये आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या शोधात भारताचा दौरा देखील केला होता. त्यानंतर जॉब्स पुन्हा अमेरिकेत परतले.