कोरोनामुळे सुरू झालेल्या कामाच्या नवीन पद्धतींमध्ये वर्क फ्रॉम होम (Work From Home) हे नवे वर्क कल्चर अनेक कंपन्यांमध्ये सुरू झाली आहे. ऑनलाइन काम असलेल्या कर्मचाऱ्यांना या पुढे आयुष्यभर किंवा काही वर्ष घरूनच काम करावे लागेल, अशी कल्पना अनेकांनी केलेली नव्हती. मात्र आता अनेक कामगारांना घरूनच काम करावे लागत असल्याने वर्क फॉर्म होमच्या सेटअप साठी लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली . या सर्वात जास्त मागणी आहे ती लॅपटॉपला. कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल काम करण्यासाठी संगणक किंवा लॅपटॉप हा महत्त्वाचा घटक असतो. संगणकावर काम करण्यात काही मर्यादा येत असल्याने आता अनेकांची पसंती ही लॅपटॉपलाच आहे. त्यामुळे लॅपटॉपची मागणी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा खप शहरातच नाही तर ग्रामीण भागात किंवा लहान शहरांमध्ये देखील झपाट्याने होत आहे.