‘तो’ शानदार प्राणी भारतात परततोय
पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी. मात्र भारतीय जंगलातून तब्बल ७० वर्षापूर्वी ‘तो’ लुप्त झाला. आता ‘त्या’ देखण्या आणि शानदार प्राण्याला पुन्हा भारतीय जंगलात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ‘त्या’च्या आगमनाने भारतीय जंगले समृद्ध होतील.
सध्या भारतीय जंगलात चित्त्याचे अस्तित्वच नाही. त्यामुळे भारत सरकारने जंगलात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी परदेशातून चित्ते आणले जाणार आहेत. सध्या आशियाई चित्ता हा आशिया खंडात केवळ इराणमध्ये तग धरुन आहे. काही वर्षापूर्वी इराणकडे चित्याच्या काही जोड्यांची मागणी भारत सरकारने केली होती. पण इराणने ही मागणी धुडकावून लावली. भारतात नामशेष झालेला चित्ता आणि इराणमध्ये सध्या अस्तित्वात असलेला चित्ता हे जैविकदृष्ठ्या बऱ्यापैकी एकच आहेत. त्यामुळे इराणमधील चित्त्यासाठी भारताचा अधिवास हा अतिशय योग्य आहे, असा शास्त्रज्ञांचा कयास होता. पण भारतात पुनर्वसनासाठी इराणने चित्ते देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताने आता आफ्रिकेतील नामिबिया देशाकडे चित्त्याबाबत विचारणा केली आहे. त्यासाठी बोलणी सुरु असून ती यशस्वी झाली आहेत. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चित्याच्या चार ते सहा जोड्या भारतात दाखल होतील. हे चित्ते मध्यप्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात सोडण्याची जय्यत तयारी सुरु आहे.