नीरज हातेकर
मुंबईत ससून डॉकला रोज सकाळी ताज्या माशांच्या लिलाव होतो. बोटीतून मासे उतरले की बोली सुरू होते. मासे टोपलीत असतात आणि टोपली भोवती कोंडाळे करून खरेदीदार बोली लावत असतात. ‘सातशे ..सातशे ..सातशे’... मग कोणीतरी ‘साडेसातशे’ म्हणतो..‘साडेसातशे..साडे सातशे ..साडे सातशे...’ नवी बोली लागते.
विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यापासून महायुती आणि आणि महाविकास आघाडीचे जाहीरनामे येईपर्यंतचा सगळा प्रवास ससून डॉकवरच्या माशांच्या लिलावाची आठवण करून देणारा आहे. राजकीयदृष्ट्या काळ विचित्र आलेला आहे. राजकारण इतके उघडपणे सत्ताकेंद्री कधीच नव्हते. या विचित्र राजकारणाचे अर्थकारण सुद्धा तितकेच विचित्र आहे.