पोलिस कम्प्लेंट केली पुढे काय ?
आपल्याबाबत एखादी चुकीची घटना घडली, अन्याय झाला की, पीडित पोलिस कम्प्लेंट करण्यासाठी सर्वप्रथम पोलिस ठाण्यात धाव घेतो. तेथे अर्ज करून तक्रार देण्यास सांगतात. त्यावर एफआयआर झाला का? गुन्हा दखलपात्र की अदखलपात्र आहे? हे लक्षात येत नाही. यामध्ये केवळ पोलिस कम्प्लेंट केली एवढेच अनेक पीडितांना माहित असते. याविषयी...
कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासह कायद्याचे रक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणा सदैव तत्पर असते. नागरिकांच्या सेवेसाठी व सुरक्षिततेसाठी पोलिस ठाण्याचे दरवाजे चोवीस तास खुले असतात. दरम्यान, एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्यास, चुकीचे घडल्यास पीडित व्यक्ती पोलिस कम्प्लेंट करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाते. येथे सुरुवातीला पीडित व्यक्तीला सर्व माहिती विचारून तक्रार अर्ज करण्यास सांगितले जाते. त्यानुसार ठाणे प्रमुख पुढील प्रक्रिया करतात. दखलपात्र गुन्हा दाखल करायचा की अदखलपात्र नोंद करायचा हे पाहिले जाते. दरम्यान, अर्ज दिल्यानंतर सर्व प्रक्रिया झाली असे पीडित व्यक्तीला वाटते. आपण पोलिस कम्प्लेंट केली एवढेच अनेकांना ठाऊक असते.
दरम्यान, कुठल्याही गुन्ह्यात किंवा घटनेच्या तपासासाठी एफआयआर हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असतो. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. एफआयआर लिहिल्यानंतरच पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करतात. त्यामुळे एफआयआर तयार केला जातो. यासाठी तक्रारदार व्यक्तीचा जबाब नोंदवून घेतला जातो. तक्रार अथवा गुन्ह्यासंबंधित महत्वाची बाब म्हणजे 'एफआयआर' असते. मात्र, याविषयी पुरेशी माहिती नसल्याने सामान्य नागरिकांना अडचणी येतात. एखादा गुन्हा घडल्यास त्यासंदर्भातील प्रथमदर्शनी गुन्ह्याची सविस्तर नोंद म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात एफआयआर होय. मराठीत गुन्हाचा प्राथमिक माहिती अहवाल म्हणतात. यामध्ये गुन्ह्याची पहिली माहिती असते. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर लिहिलेला हा पहिला अहवाल असतो.