अतुल तोडणकर, अभिनेता
आर्थिक नियोजन विशेषतः आजच्या काळात किती आवश्यक आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली, ती कोविड महासाथीच्या काळात. आपल्या सर्वानांच हा मोठा धडा मिळाला.
त्या काळात काम बंद असल्याने मी १८ महिने घरी होतो, तेव्हा आधार दिला तो नियोजनपूर्वक पूर्वीपासून केलेल्या आर्थिक गुंतवणुकीनेच.
आता काही महिन्यांपूर्वी मला ‘ब्रेन हॅमरेज’ झाले तेव्हाही हातात पैसा असल्यामुळे चांगले उपचार घेऊ शकलो, सात-आठ महिने काम न करता प्रकृतीवर लक्ष देऊ शकलो, ते आर्थिक नियोजनामुळे.
नाटक, सिनेमा अशा अस्थिर क्षेत्रात काम करत असताना पूर्वीपासून करत असलेली गुंतवणूकच मोठा आधार ठरली, केवळ संकटांवर मात करण्यासाठीच नाही, तर आयुष्यभर पाहिलेले घराचे मोठे स्वप्न पूर्ण करण्यातही ही गुंतवणूकच भक्कम पाया ठरली.