आर्थिक नियोजन हे कायम केले पाहिजे. परंतु, अभिनय हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे. कधी काम मिळेल हे माहीत नसते. त्यामुळे मिळालेल्या रकमेतून काही भाग बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा त्यातून थोडी बचत करण्याचा माझा प्रयत्न असतो.
नोकरी करणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या मार्गाने गुंतवणूक करणे सहजशक्य असते. परंतु, अनियमित उत्पन्न असल्याने आम्हाला ते शक्य नसते. एखादी मालिका ५ ते ६ वर्ष सुरू असते, अशा वेळेस नियमितपणे मानधन सुरू असते.
त्यातूनच मग गुंतवणूक होऊ शकते. काही वेळेस एकरकमी पेमेंट मिळाल्यावर त्यातूनच काही बचत, गुंतवणूक केली जाते. मी एफडी, म्युच्युअल फंड यामध्ये बचत करतो. पारंपरिक पर्यायांकडे माझा कल अधिक आहे.
शेअरबाबत मला फारशी माहिती नसल्याने मी त्यात गुंतवणूक करत नाही. त्यामध्ये धोका असू शकतो असे मनामध्ये बिंबवले होते. त्यामुळे मी तिकडे वळलो नाही.