शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते
पूर्वीच्या काळातील कलाकार आर्थिक गुंतवणुकीबाबत फारसे सजग नव्हते. आज मिळालेला पैसा आज उधळून टाकायचा असा खाक्या होत्या, त्यामुळे अनेक कलाकारांची दैन्यावस्था झालेली आपण ऐकली, पाहिली आहे.
आता परिस्थिती बदलली आहे. आजची पिढी आर्थिक नियोजन, गुंतवणूक याबाबत सजग आहे. आता त्यासाठी मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ सहज उपलब्ध आहेत, गुंतवणुकीचे विविध पर्यायही उपलब्ध आहेत.
मी जेव्हा १९८९ मध्ये ‘बेस्ट’मध्ये नोकरी सुरू केली तेव्हा फार काही पगार नव्हते आणि गुंतवणूक कशात करावी, हे सांगणारेही कोणी नव्हते. पारंपरिक पद्धतीने आयुर्विमा पॉलिसी, पोस्टातील योजना यातच गुंतवणूक केली जात असे.
आर्थिक नियोजन, गुंतवणूक हे शब्द आम्हाला उशिराच कळले असले, तरीही मी या क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने पैसा वाढेल अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक सुरू केली. त्याचा फायदा मला संकटाच्या काळात झाला.