कविता लाड, अभिनेत्री
आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर मला असं वाटतं आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या आवाक्याबाहेर खर्च न करता राहणं. अंथरूण पाहून पाय पसरावेत, असं म्हणतात, तसं राहावं. तसं राहिलं की बाकी सगळ्या गोष्टी आटोपशीर होतात.
आर्थिक गुंतवणुकीला मी अगदी पहिल्यापासून सुरुवात केली. माझ्या हातात नेहमी एक सोन्याचं कडं असतं. मी नेहमी म्हणते, की हे कडं माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान आहे.
कारण ज्यावेळी मला नाटकाची नाईट ३०० रुपये मिळायची, त्यावेळी अनेक प्रयोगांचे पैसे साठवून पाच हजार रुपये तोळा सोनं असताना हे एक तोळ्याचं सोन्याचं कडं मी घेतलं. त्यामुळे ते माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे.
अगदी कमवायला लागल्यापासून मी गुंतवणूक करायला सुरुवात केली म्हणून मला माझं हे स्वप्न म्हणा, उद्दिष्ट म्हणा पूर्ण करणं शक्य झालं.