मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री
आर्थिक नियोजन म्हणजे आपण अतिशय मेहनत करून कष्ट करून जो पैसा मिळवतो, त्या पैशाचे व्यवस्थापन. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत माझे बाबा जागरूक होते, त्यामुळे खूप लवकर मी गुंतवणुकीला सुरुवात केली.
‘स्वामी’ मालिकेत मी काम केलं, त्याचे पैसे ही माझी पहिली कमाई होती. त्यातून मी गुंतवणूक केली नाही, कारण ती कमाई फारच कमी होती. त्याआधी रेडिओवर काही छोटे-मोठे कार्यक्रम करून थोडेफार पैसे मिळायचे. त्याची मात्र बचत व्हायची.
महाराष्ट्र बँकेत माझं ‘मिंटी’ नावाचं अकाउंट होतं. त्यात बचत केली जायची. स्वतःचा पैसा खर्च करायचं ते वय नव्हतं, त्यामुळे जे मिळायचं, ती सगळी बचतच असायची; पण माझ्या बाबांनी मला पहिल्यापासून याचं महत्त्व शिकवलं होतं.
ते मला नेहमी सांगायचे, की जेवढे पैसे तू कमावशील, तेवढेच पैसे मी तुला देईन. पैसे कमवायचे आणि नुसतेच बँकेत ठेवायचे असं नाही, तर पुढे वडिलांनी मला ‘पीपीएफ’ खातं काढून दिलं. त्या वयात आपण कमवायला आणि बचत करायला लागलो, तर आपल्यासमोर नेहमी एक लक्ष्य राहतं.