संदीप खरे, पुणे
आजीला जवळ घेऊन बसलो आहे
पण ती जसं जवळ घ्यायची
तसं घेता येत नाही !
जीर्ण हाडांची ही छोटी मऊ मोळी
आता तर फार घट्ट बिलगताही येत नाही !
एकेक ओळखीचे नाहिसे होत जाताना
जे उरले त्याला बिलगून घेतो आहे..!
चाललाय खरा सारा आटापिटा..
पण आतून कापत चाललो आहे !!
तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवली आहेत तिने अनेक वर्षं...
मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे
अगणित सुखदुःखी स्पर्श !
आजी नव्हे, एक आख्खा भूतकाळ आत्ता कुशीत आहे..
प्रत्येक क्षणाला धरू पाहतो आहे तिचे जिवंत असणे
पण काळ तर सरकतच चालला आहे !!
आणि माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी
म्हणून तिने तरी किती थांबावे..?!
जीर्ण पिंजऱ्यात घुसमटते आहे आता पाखरू
त्याला तरी किती कोंडावे ?!