रवी मुंबईतील आपल्या अत्याधुनिक कार्यालयात दैनंदिन काम करत बसलाय. सायंकाळचे सहा वाजले आहेत. तासाभरात घरी पोहचण्याचा त्याचा विचार आहे. तेवढ्यात न्यूयॉर्कमध्ये वित्तीय सेवा पुरविणाऱ्या मोठ्या कंपनीचा तांत्रिक प्रमुख असलेल्या जॉनचा संदेश रवीच्या हातातील घड्याळात चमकतो. मोठी तांत्रिक अडचण आली असल्याने तातडीने प्रत्यक्षात भेटले पाहिजे असा आशय त्या संदेशाचा असतो. जॉन त्यावेळी ऑफिसच्या कामासाठी पॅरिसमध्ये असतो. त्यांच्या न्यूयॉर्क कार्यालयातील मुख्य सर्व्हरला जोडलेल्या यंत्रणेत बिघाड झालेला असतो. अमेरिकेतील कार्यालये सुरू होण्यापूर्वी ती अडचण दूर करण्याची गरज असते. अन्यथा कोट्यवधी डॉलरचा फटका जॉनच्या कंपनीला बसण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शहरातील वित्तीय सेवा ठप्प पडतील हे वेगळेच.