खेळाडूंचा 'मानसिक खेळ'
अभिषेक सांडीकर
प्रत्येक वर्षी जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा होत असतात. पण मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे या स्पर्धांना ब्रेक लागला होता. नंतर 'बायोबबल' संकल्पना आल्यानंतर या स्पर्धा कोरोनाकाळातही होऊ लागल्या होत्या. पण त्यामध्ये कोरोनाची बाधा होण्याचा धोका काही प्रमाणात होताच. दुसऱ्याबाजूला अनेक खेळाडू बायोबबलमध्ये असूनही त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन हे या काळातील मोठं धाडसाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या 3-4 काही महिन्यांपूर्वीही टोकियो ऑलिंपिकवर अनिश्चिततेचे सावट होते. पण शेवटी जपानने त्यांची संधी न दवडता या स्पर्धांचे आयोजन केले आहे आणि ऑलिंपिक व्यवस्थितरित्या पार पाडले जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला कोरोनाचे सर्व नियम पाळून बायोबबलमध्ये राहणे बंधनकारक आहे.
जगात सध्या ऑलिंपिक स्पर्धा जी सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते ती होत असल्याने क्रीडाप्रेमीही खूश असून ते घरूनच या स्पर्धांचा आनंद घेत आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच युरोपातील प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा युरो चषक, दक्षिण अमेरिकेतील कोपा, क्रिकेटचा विचार केला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि विंम्बलडन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांवरही कोरोनाचे सावट होतेच. दुर्दैवाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
क्रीडा किंवा विविध खेळ हा आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. कारण भारतासारख्या देशाचा विचार केला तर इथं सचिन तेंडूलकर हा खेळाडू माहित नसणारा क्वचितच सापडेल. कारण भारतात मागील चार ते पाच दशकांपासून क्रिकेट हा एक प्रसिध्द खेळ म्हणून समोर आला आहे. पाश्चिमात्य देशांचा विचार केला तर तिथं फुटबॉलला लोकांची जास्त पसंती दिसते. तसेच विविध अॅथलेटिक्स गेमही तिथं प्रसिध्द आहेत. जसा देश तशी तिथली क्रीडा संस्कृती बदलत जाताना दिसते. खेळ हा आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवतो. समाजात त्यामुळे समावेशकतेची आणि एकतेची भावना निर्माण होते. जर एखादा देश एका विशिष्ट क्रीडा प्रकारात सरस असेल तर त्यामुळे त्या देशाचा आदर आणि दबदबाही वाढतो. शीत युद्धादरम्यान जागतिक स्पर्धांमध्ये मोठी चुरस दिसत होती कारण त्यावेळेस जगभरात विभाजनवादी विचारसरणी बळकट होऊ पाहत होती. पण कधीकाळी या स्पर्धांनीची जगाला एकत्र ठेवल्याचेही दिसते.
आपण घरी बसून विविध स्पर्धा पाहत असतो. त्यावेळेस आपल्या मनात एकच विचार असतो की आपला देश किंवा आपण ज्या खेळाडूंना पाठिंबा देत आहोत तोच जिंकावा. पण प्रत्यक्षात स्पर्धा मैदानावर खेळल्या जात असताना त्या खेळाडूच्या मनात काय सुरू आहे याचा आपण कधी विचार करत नाही. तसं ते आपल्याला महत्वाचंही वाटत नाही. खेळाडूला ताण, प्रचंड दबाव आणि देशाच्या अपेक्षांचा विचार करत मार्ग काढावा लागतो. कधीकधी तो ताण एवढा वाढतो की खेळाडू स्पर्धेतील हार-जीत नंतर अनपेक्षित निर्णयाकडे ओढले जातात. त्यामुळे एक क्रीडाप्रेमी म्हणून तुम्ही कधी त्या खेळाडूच्या मनात काय सुरू असेल याचा यापूर्वी कधी विचार केला होता का?
सध्याच्या काळात तर प्रत्येक खेळाडूला कोरोनामुळे बायोबबलमध्ये रहावे लागत आहे. हे खेळाडू त्यांच्या आप्तांपासून, घरच्यांपासून लांब कोसो दूर खेळत असतात. वरून या खेळाडूंना 'जर आपण हारलो तर...', याचीही भीती सतावत असते. त्यामुळे स्पर्धेच्या अगोदर आणि स्पर्धेदरम्यान हे खेळाडू प्रचंड दबावात असतात. तर दुसऱ्या बाजूला चाहत्यांच्या आणि देशवासियांच्या अपेक्षांचं ओझही या खेळाडूंना वाहवे लागत असते. याचा खेळाडूच्या मानसिक आणि शाररिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून या खेळाडूंना विविध आजारांवा समारे जावे लागते.
अनेक खेळाडू मानसिक आजाराचे बळी-
अजूनही बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यावर म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. भारतासारखा देश तर याबाबतीत बराच मागास आहे. भारतात मानसिक विकार तज्ज्ञांचे प्रमाणही अल्प आहे. सामान्यांसारखेच खेळाडूंनाही मानसिक आजारांना समाोरे जावे लागत असते. पण त्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही दिले तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. तसेच आपल्यामध्ये मानसिक आरोग्याबद्दल खूप कमी प्रमाणात जागरूकता आहे. कमी असलेल्या जागरूकतेमुळे अनेकांना याचा तोटा होत आहे.