वसंत कुलकर्णी
भारताला जगाची औषधशाळा (फार्मसी) म्हटले जाते. भारतीय औषधनिर्माण (फार्मास्युटिकल) उद्योगाने मागील आर्थिक वर्षात ८.८ टक्क्यांची वृद्धी नोंदविली.
आरोग्यनिगा उद्योगातील श्वसन, संसर्गविरोध आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांनी सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे १९.२ टक्के, १७.२ टक्के आणि १०.७ टक्के अशी दोन अंकी मूल्य वाढ नोंदविली. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत औषधनिर्मिती कंपन्यांनी उत्तम निकालांची नोंद केली.
मागील तिमाहीपेक्षा सध्याच्या (जुलै ते सप्टेंबर) तिमाहीत औषधनिर्मिती कंपन्या आपल्या नफ्यात समाधानकारक वाढ नोंदवतील, असा विश्लेषकांचा कयास आहे.
औषधनिर्मिती कंपन्या सामान्यतः आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात (ऑक्टोबर ते मार्च) पहिल्या सहामाहीपेक्षा अधिक वाढ नोंदवतात, असे दिसून येते.
कोविड महासाथीनंतरच्या काळात आरोग्यसेवा क्षेत्राची कामगिरी कोविडपूर्वीच्या कामगिरीपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी आहे. ‘एस अँड पी बीएसइ हेल्थकेअर इंडेक्स’ने २०१६ ते २०२० या कालावधीत -२ टक्के वार्षिक परतावा दिला. परंतु, एप्रिल २०२० ते जून २०२४ या कालावधीत हा निर्देशांक वार्षिक २६ टक्यांनी वाढला.
याच काळात ‘निफ्टी-५०’ने १६ टक्के वार्षिक वाढ नोंदविली. आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन सर्वकालीक उच्चांकी आहे. मूल्यमापन उच्चांकी असूनही आरोग्यसेवा क्षेत्राचे नफा-जोखीम गुणोत्तर नफ्याच्या (नव्या गुंतवणुकीच्या) बाजूला झुकलेले आहे.