अभिजित कोळपकर
सुनीत हा एक चांगला अभिनेता होता. काही वर्षांच्या मेहनतीनंतर आता चित्रपटसृष्टीत त्याचा जम बसायला लागला होता आणि त्याला चांगले दिवस आले होते.
आता त्याला चांगली कामेही मिळायला लागली होती. त्याच बळावर त्याने चांगली कार घेतली आणि एका नव्या सिनेमाचे काम मिळाल्यामुळे त्याने घरही बुक केले.
त्यासाठी त्याने पाच कोटींचे कर्ज घेतले होते. सिनेमाचे कामही सुरू झाले होते. बऱ्याच स्ट्रगलनंतर सुनीतच्या कष्टांना फळ आलेले दिसत होते; पण अचानक कोविडची महासाथ सुरू झाली आणि सगळे चित्र पालटले.
जमावबंदी लागू झाली, त्यामुळे चित्रिकरणही बंद पडले, पैशांचा ओघही बंद झाला; पण कर्जाचे हप्ते मात्र सुरुच राहिले. ते भरताना सुनीतच्या नाकीनऊ येत होते. कारण त्याने इतर कोणतीही लहान-मोठी बचत न करता एकदम घर घ्यायची उडी घेतली होती.
आता आपला जम बसलाय, आपल्याला आता सतत भरपूर पैसे मिळत रहाणार आहेत, ही त्याने आपल्या मनाची धारणा करुन घेतली होती. परिस्थिती आहे; त्यापेक्षा चांगलीच होत जाणार आहे, या मानसिक धारणेला ‘ऑप्टिमिझम बायस’ असे म्हणतात.