maharashi arvind ghosh
maharashi arvind ghoshsakal

आध्यात्मिक राष्ट्रवादाचे उद्‌गाते

श्री अरविंदांच्या ‘Rebirth of India’ या पुस्तकातील विचारसूत्रानुसार भारत हा असा एकमेव देश आहे, जो केवळ अधिभौतिक बाबींपुरताच मर्यादित नाही
Published on

-प्रा. वेदांत कुलकर्णी

योगी अरविंदांचे १५० वे जयंतीवर्ष १५ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झाले. योगी अरविंदांनी राष्ट्रवादाच्या अाध्यात्मिक पैलूची मांडणी केली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील एका अद्वितीय व्यक्तिमत्वाचा परिचय.

योगी अरविंद यांच्या जीवनाला अनेक पैलू होते. बडोद्यात सयाजीराव गायकवाड महाराजांच्या काळात तेथील मुलकी प्रशासक, त्यानंतर बडोदा महाविद्यालयात प्राध्यापक, मग कोलकत्ता येथील राष्ट्रीय विचारांनी भारलेल्या नॅशनल कॉलेज येथे प्राचार्य, मग स्वातंत्र्यसंग्रामात केलेले राष्ट्रीय लेखन आणि जागृती, त्यानंतर कवी म्हणून त्यांनी केलेले काव्यसाधन, त्यानंतर पाँडिचेरीरुपी तत्वज्ञानगुंफेत केलेले तत्त्वचिंतन आणि योगसाधन असा हा बहुविध पैलूंनी युक्त असा प्रवास होता.

maharashi arvind ghosh
काय म्हणता?, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध!

प्रारंभी, १८९३ ते १८९७ श्री अरविंद बडोदानरेश सयाजीराव महाराजांकडे प्रशासक आणि सल्लागार म्हणून काम पाहत होते. दहा वर्षे त्यांनी प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून व्यतीत केली. ते अर्थातच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. एखाद्या अध्यापन विषयावर प्रारंभीचा धांडोळा घेणारी काही व्याख्याने, त्यावर झालेली साधक-बाधक चर्चा, त्या पाठाचे मोठ्याने केलेले वाचन, अवघड संकल्पनांचे केलेले यथायोग्य विवेचन, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आणि त्यानंतर पुनश्च एकवार केलेले समग्र प्रतिपादन ही त्यांची खास शैली होती. त्यातच, बडोदा येथील प्राद्यापकांची दरमहा ७५० रु वेतनाची नोकरी सोडून ते राष्ट्रीय विचारांनी भारलेल्या नॅशनल कॉलेज, कोलकत्ता येथे दरमहा रुपये ३०० या वेतनावर रुजू झाले. तेथे त्यांनी राष्ट्रीय विचारांची जागृती केली. जहालमतवादी आणि स्वातंत्र्योपासक असलेले श्री अरविंद वैखरीचे उपासक होते. वाग्देवता त्यांच्यावर प्रसन्न होती. त्यांची व्याख्याने दुर्दम्य आशावाद, जाज्वल्य राष्ट्रप्रेम, आत्यंतिक राष्ट्रवाद, टोकाचा ध्येयवाद यांनी भारलेली असत.

maharashi arvind ghosh
पंछी नदिया पवन के झोंके

श्री अरविंदांच्या ‘Rebirth of India’ या पुस्तकातील विचारसूत्रानुसार भारत हा असा एकमेव देश आहे, जो केवळ अधिभौतिक बाबींपुरताच मर्यादित नाही, तर त्याच्यापल्याड असणाऱ्या आध्यात्मिक अधिष्ठानाचे मूर्त आणि सचेतन असे सगुण साकार रूप आहे. म्हणूनच, भारताकडे जगाला देण्यासाठी महान असे अनेक संदेश आहेत. त्यासाठीच, राष्ट्राच्या आत्म्याबरोबरच व्यक्तीचा आत्मादेखील महत्त्वाचा आहे. कारण, त्यातूनच राष्ट्राचे उन्नयन घडणार आहे. श्री अरविंद भारताच्या स्वातंत्र्याचे चिंतन करत असतानाच ते अवघ्या मानवकुलाच्या कल्याणाचीही स्वप्ने पाहात असत. त्यांनी आपले चिंतन भारतापुरते सीमित न ठेवता त्याला विश्वरूप दिले. त्यांनी पाहिलेली पाच स्वप्ने त्यांच्या अवघ्या मानवकुलाच्या कल्याणाच्या अंतर्मुख करणाऱ्या व्यापक विचारांचे द्योतक आणि निदर्शक आहे. त्यांची पाच स्वप्ने म्हणजे ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेल्या पसायदानाचेच आधुनिक रूप आहे. त्यांनी संकुचितता जातीयता, प्रांतीयता,मनाचे कोतेपण, स्वार्थ या सर्वांचा अव्हेर केला. भारताचे स्वातंत्र्य, आशियाचा उदय, जगाची एकता आणि अखंडता, भारताने जगाला द्यावयाची आध्यात्मिक भेट आणि त्यातून अवघ्या मानवजातीचे होणारे उन्नयन हीच ती पाच स्वप्ने होत.

maharashi arvind ghosh
भारत-अफगाणिस्तानमधील व्यापार संबंधांवर प्रश्‍नचिन्हे

अरविंदांचे महाकाव्य

जागतिक दर्जाच्या अभिजात इंग्रजी कवींमध्ये श्री अरविंदांची गणना होते ते त्यांच्या ‘सावित्री’ या अजरामर अशा महाकाव्यामुळे. हे त्यांनी रचलेलं २४ हजार ओळींचे महाकाव्य आहे. महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांच्या पवित्र नात्याचे आणि सावित्रीच्या सत्यवानाचा केलेल्या असीम त्यागाचे आणि उदात्त भावनेचे यात चित्रण आहे. मात्र, हे महाकाव्य तेवढ्यापुरतेच सीमित न राहता माणासाच्या आध्यात्मिक उन्नयनावर केलेले ते एक सांगोपांग भाष्य आहे. यातच, राजकारणाने प्रश्न कायमचे सुटणार नाहीत, तर त्यासाठी आध्यात्मिक उन्नयनाचीच कास धरावी लागेल. या ईश्वरी संकेतानंतर १९१० ते १९४७ ही जवळपास ३७ वर्षे श्री अरविंदांनी पाँडिचेरी येथे तत्त्वचिंतन आणि योगसाधना यात व्यतीत केली.

मानस, आदिमानस, मानवाचे उन्नयन या संकल्पना समजावून देतानाच मानवी जीवनाचे आध्यात्मिक आणि त्याद्वारे दैवी जीवनात झालेले रूपांतरण म्हणजेच मानवाचा महामानव आणि महामानवाचा देव होणे, ही श्री अरविंदांच्या तत्वचिंतनातील मुख्य विचारसूत्रे आहेत. श्री अरविंदांच्या विचारपूर्वक अवलंबल्या गेलेल्या be yourself, transform yourself and transcend yourself या त्रिसूत्रीची नितांत गरज आहे. युवकांची पावले भारताच्या आध्यात्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पाँडिचेरी कडे वळली आणि तिथे त्यांनी श्री अरविंद आणि माताजीप्रणित मौलिक विचारांचे मनोमन चिंतन केले तर भारताची आध्यात्मिक उन्नतीची वाट सुलभ होईल.

maharashi arvind ghosh
'तालिबान' आणि इस्लाम बदनाम!

अस्सल भारतीयत्व

आपल्या मुलाच्या मनात राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यलढा या गोष्टीचे जरादेखील आकर्षण निर्माण होऊ नये अशी श्री अरविंदांच्या पित्याची इच्छा होती. त्याचाच एक भाग म्हणून वडिलांनी श्री अरविंदांना त्यांच्या वयाच्या अवघ्या सातव्याच वर्षी ब्रिटनला शिक्षणासाठी पाठवून दिले. तिथे ते शिकतील, घडतील आणि भारतीय संस्कृती व परंपरा यांपासून ते दूर राहतील, असे वडिलांना वाटत होते. मात्र, झाले ते पूर्णतः उलटेच. श्री अरविंद भारतात आले, इथेच राहिले, रमले आणि पूर्णपणे भारताशी आणि भारतीय संस्कृतीशी तादात्म्य पावले. एवढेच नव्हे, तर ते भारतीय संस्कृतीचे उपासक आणि तत्त्वज्ञानाचे जाणकार तथा भाष्यकार झाले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून त्यांच्यातील अस्सल भारतीयत्वाचा परिचय घडतो.

(लेखक श्री अरविंद केंद्र, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...