पंछी नदिया पवन के झोंके

पंछी नदिया पवन के झोंके

Published on

पंछी नदिया पवनके झोंके

कोई सरहद ना इन्हे रोकें

सरहदें इन्सानों के लिए हैं

सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां हो के

उत्तर ध्रुव प्रदेशात हिमवादळांसह थंडीचा कडाका सुरू झाला की जवळच्या सैबेरियातील पक्षी तो प्रदेश सोडायला उड्डाण करतात. रशिया, चीन हे अजस्र पसरलेले देश पार करून हिमालयासारख्या उच्चतम नगाधिराजाला ओलांडून थेट भारतातील महाराष्ट्रात येऊन पाणी आणि अन्न मिळेल अशा धरणांकाठी, सरोवरांकाठी आसरा घेतात. थंडी सरली की माघारी फिरत पुन्हा आपल्या मूळ प्रदेशाकडे विनाअडथळा सुखरूप परततात. रशियातून चीनमध्ये, चीनमधून नेपाळमध्ये आणि नेपाळमधून भारतात येण्यासाठी ना त्यांना स्वदेशाच्या पासपोर्टची गरज, ना परदेशाच्या व्हिसाची. चीनमध्ये मानसरोवरात उगम पावणारी सिंधू नदी भारतात लडाखमधून वाहत-वाहत पाकिस्तानात प्रवेश करते. सगळा पाकिस्तान मार्गक्रमित करीत अरबी समुद्राला जाऊन मिळते. तीच गोष्ट ब्रह्मपुत्राची. चीनमध्ये मानसरोवराजवळ उगम पावून भारतात आसाममधून मार्गक्रमित पुढे बांगलादेशकडे मार्गस्थ होत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. वाऱ्याचे तर काही विचारायलाच नको. त्याला ना कुठला मार्ग ना कुठली दिशा. ना थंडी ना ऊन. सतत वाहत राहायचे तेवढे माहीत. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे. मध्ये आडवा येणारा समुद्र कोणता किंवा आडवी येणारी भूमी कोणत्या देशाची ती फिकीर नाही. बंधन नाही. पंचमहाभूतांच्या कुठेही वावरण्याला मर्यादा नाही. मग माणूसच असा का, की ज्याच्या कुठेही जाण्या-फिरण्याला अनेक मर्यादा आहेत. माणसाने स्वत:चे नागरिकीकरण केले. घर, गाव वसवले. त्याचे राष्ट्र बनवले. मात्र त्यानेच राष्ट्राराष्ट्रांतून प्रवासाच्या मर्यादा पडल्या. माणूस म्हणून खरेच आपण प्रगत झालो आहोत का? मनुष्य म्हणून नेमके आपण काय प्राप्त केले आणि काय गमावले? असले विचार करण्याची गरज तेव्हाच भासते, जेव्हा अशा मर्यादांची बंधने अतिशय कठोर आणि टोकदार असतात.

या मर्यादा, सीमा, सरहद यांच्या बंधनांमुळे जनसमूहातून निर्वासित आणि विस्थापित असा एक वर्ग निर्माण झाला आहे. जगभरामध्ये अलीकडे निर्वासितांचे लोंढेही मोठी समस्या बनू पाहत आहेत. युरोममधल्या देशातून सीरियन निर्वासित पसरले, तर अमेरिका, मेक्सिकन निर्वासितांना रोखण्यासाठी सीमेवर भिंतींचे कुंपण घालण्याचा विचार करीत आहे. भारत देश तर त्याच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत या समस्येला तोंड देतोय. अशाच एका निर्वासित कुटुंबाची ही कहाणी. १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती होताना भारताची धर्माच्या आधारावर फाळणी झाली. त्या वेळी बिहारमध्ये राहत असलेले मन्सूर नामक व्यक्तीचे एक मुस्लिम कुटुंब आपले लोक ‘तिकडे’ आहेत. तिकडे आपण सुरक्षित असू, अशा विचाराने बिहारमधील आपले गाव, घर वाऱ्यावर सोडून पूर्व पाकिस्तानातील पूर्व बंगालमध्ये स्थलांतरित झाले. पुढे फक्त २४ वर्षांनंतर १९७१ मध्ये बंगाली अस्मितेचा मुद्दा निर्माण होऊन पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेश निर्माण झाला. मन्सूर ठरला बिहारी. तो मुस्लिम असला तरी आता मुद्दा हिंदू-मुस्लिम नसून तो होता बंगाली विरुद्ध इतर असा. पुन्हा एकदा विस्थापित होऊन त्याला कुटुंबासह देश सोडावा लागला. बिहारमध्ये रुजलेली पाळेमुळे चोवीस वर्षांत पूर्णपणे उखडली गेली होती. परत बिहारला जाण्यात अर्थ नव्हता. कराचीला एक मावसभाऊ आहे. त्याच्या आश्रयाला पाकिस्तानात जावे अशा विचाराने वृद्ध आई, पत्नी, धाकटा भाऊ, भावजय आणि तरुण कन्या असे ते कुटुंब निर्वासित म्हणून आसामात गुवाहाटीला आले. तेथून दिल्ली, अजमेर, अहमदाबाद अशी लांबलचक सफर करीत कसेबसे गुजरातचा सीमान्त प्रदेश असलेल्या कच्छपर्यंत आले.

पासपोर्ट नसूनही बांगलामधून माणसांचे लोंढे आसामात येत होते तेव्हा भारतप्रवेश सोपा गेला, पण आता विनापासपोर्ट भारतातून पाकिस्तानात घुसखोरी करणे कठीण होते. अवैधरीत्या इकडच्या लोकांना तिकडे पोचविण्याचा बेकायदेशीर उद्योग काही लोकांचा आहे. अनुपम खेर हा एक दलाल मन्सूरला एक मोलाचा सल्ला देतो. खरेतर जीवनातील सत्य तो एका वाक्यात सांगतो. पाकिस्तानात तुमचा कुणी नातेवाईक आहे का? या त्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना मन्सूर सांगतो, की हो एक दूरचा मावसभाऊ आहे कराचीला. तर मग तुम्ही पाकिस्तानात आल्याचे त्याला समजू देऊ नका, असे अनुपमने सांगताच अचंबित होत मन्सूर त्याला असे का म्हणून विचारतो. तेव्हा अनुपम उत्तरतो, ‘इन्सान जैसा घटिया जानवर और कोई नहीं है.’ त्या मावसभावाच्या लक्षात येईल की तुम्ही इतके सारे त्याच्यावर बोजा होणार आहात आणि विनापासपोर्ट आलेले भारतीय म्हणून तो तुम्हाला पोलिसाच्या स्वाधीन करेल.

दलालाचा माणूस त्यांना रात्रीच्या अंधारात पायी सीमेपलीकडे घेऊन निघतो. हा तरणाबांड गडी आपले नाव रिफ्युजी असे सांगतो. मिठाची खारी जमीन, दलदल तुडवत गस्त चौक्यांची नजर चुकवीत हाजी पीर खिंड पार करीत ते पाकिस्तानात घुसून एका घराचा आसरा घेतात. त्याचे धाडस, कर्तव्यतत्परता पाहून मन्सूरची तरुण कन्या नाझनीन त्याच्या प्रेमात पडते. हा परत जातो; पण अधूनमधून इतर माणसांना पाकिस्तानात घुसविण्याच्या निमित्ताने त्या गावात तिला येऊन भेटत राहतो आणि एक दिवस गस्त चौकीवाल्या बंदुकीच्या गोळीचा बळी ठरतो.

राष्ट्राराष्ट्रांमध्ये असलेला सीमावाद अथवा राजनैतिक शत्रुत्व म्हणजे सामान्य नागरिकांमधील आपापसातील वैर नव्हे. राजनैतिक शत्रुत्वाच्या पलीकडेसुद्धा माणूस म्हणून सौहार्द जपणारी सामान्य जनता असते. माणसामाणसातल्या प्रेमाच्या उदात्त भावनेला कोणत्याही सीमा नसतात, नसाव्यात असा माणुसकीचा वैश्‍विक विचार या दोन प्रेमी जीवांच्या माध्यमातून गीतकार जावेद अख्तरने वारा, नदी, पक्षी यांची उदाहरणे देऊन या गीतातून मांडला आहे.

जो मैं होती नदिया और तुम पवन के झोंके तो क्या होता

पवन के झोंके नदी के तन को जब छूते हैं

लहरें ही लहरें बनती हैं

गीतरचना अर्थपूर्ण आहेच, पण सोनू निगमने अतिशय हळुवारपणे ते शब्द उच्चारून गाणे मनाला भिडेल, असे गायले आहे. अलका याज्ञिकने त्याला चांगली साथ दिली आहे. अशा भावस्पर्शी गाण्यांना स्वर देताना महंमद रफीच्या स्वरात जो हळुवारपणा असायचा तसाच काहीसा सोनू निगमचा पण आहे, हे विशेष. अनू मलिकचे संगीत छान.

कपूर खानदानातल्या थोरल्या रणधीर कपूरची द्वितीय कन्या करिना कपूर आणि महानायक अमिताभ बच्चन पुत्र अभिषेक यांचा हा पहिलाच चित्रपट. दोघांनीही मस्त काम केले आहे. रिफ्युजीचा रांगडेपणा अभिषेकने छान वठवलाय. करिना दिसते पण सुंदर. दिग्दर्शक जे. पी. दत्ताचा चित्रपट रिफ्युजी

गीत : पंछी नदिया पवन के झोंके

गीतकार : जावेद अख्तर

संगीतकार : अनू मलिक

गायक : सोनू निगम, अलका याज्ञिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()