Paralympic 2024 Sheetal devi archery: पॅरिसमध्ये पुन्हा एकदा खेळाडूंची मांदियाळी भरलेली पाहायला मिळाली. पण, हे खेळाडू सामान्यांपेक्षा थोडे वेगळे, परंतु जिद्द अन् चिकाटीच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा भारी होते. कुणी व्हिलचेअरवर बसलेलं, कुणी कुबड्यांच्या सहाय्याने आलेलं, कुणाला दोन्ही पायच नव्हते, तर काहींचे हात नव्हते. काही उंचीने कमी होते.. पण, त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, आपण काहीतरी भारी करायला इथे आलोय, ही ऊर्जा आणि उत्साह घेऊन ते पॅरालिम्पिक स्पर्धा खेळायला आले होते. इथे दिसत असलेल्या ४४०० खेळाडूंची प्रत्येकाची एक वेगळी प्रेरणादायी स्टोरी आहे. दिव्यांगत्व हा आयुष्यातील फक्त एक भाग आहे आणि त्यावर मात करून सुंदर आयुष्य कसं जगावं हे या खेळाडूंकडून शिकण्यासारखं आहे.
भारताच्या भाग्यश्री जाधवने १९ वर्षांची असताना अपघातात पायातील त्राण गमावले, शीतल देवी जन्माला आली ती दोन हातांशिवाय, मरिय्यपन थंगवेलूने ९ वर्षांचा असताना पाय गमावला, परंतु तो उंचउडीतील पदक विजेता आहे. या खेळाडूंची पॅरा स्पर्धेसाठी निवड कशी होते आणि कोणत्या गटात ( Categary) कोण फिट बसतं हे कसं ठरतं? हे आपण आज जाणून घेणार आहोत.
पॅरालिम्पिकची सुरुवात १९४८ मध्ये दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान झाली. दिव्यांगांचा एक छोटासा मेळावा म्हणून पॅरालिम्पिक स्पर्धा घेतली गेली. डॉक्टर अँटोनियो मॅग्लिओ यांनी प्रस्ताव ठेवल्यानंतर १९६० च्या रोम स्पर्धेमध्ये २३ देशांतील ४०० दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. २०२० पॅरालिम्पिकमध्ये १६३ राष्ट्रीय पॅरालिम्पिक समित्यांमधील ४५२० खेळाडू सहभागी झाले होते आणि हा खेळाडूंच्या सहभागाचा सर्वात मोठा आकडा आहे.
पॅरा ऍथलीट्सच्या अपंगत्वाची विविधता लक्षात घेता अनेक कॅटगरी तयार केल्या गेल्या आहेत, ज्यात हे खेळाडू सहभाग घेऊ शकतात. दिव्यांग खेळाडूंची दहा प्रकारांमध्ये वर्गवारी केली गेलेली आहे. कमकुवत स्नायू शक्ती, अवयवांची कमतरता, पायांच्या लांबीचा फरक, लहान उंची, हायपरटोनिया, अटॅक्सिया, एथेटोसिस, दृष्टीदोष आणि बौद्धिक कमजोरी अशी दहा वर्गवारी केली आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत वर्गीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यानुसार कोणते खेळाडू एखाद्या खेळात भाग घेण्यास पात्र आहेत की नाही हे ठरवले जाते. पॅरा स्पोर्ट्समध्ये दिव्यांगत्वामुळे होणाऱ्या हालचालींच्या मर्यादांनुसार खेळाडूंचे गट केले जातात. वेगवेगळ्या खेळांसाठी खेळाडूंना विविध क्रिया करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक खेळासाठी दिव्यांग खेळाडूंची क्षमता लक्षात घेऊन त्यांना समान संधीच्या व्यासपीठावर आणून बसवले जाते. खेळाडूंच्या कामगिरीवरील दुर्बलतेचा प्रभाव कमी करणे हे वर्गीकरणाचे उद्दिष्ट आहे.
वर्गीकरणाच्या प्रक्रियेला "ऍथलीट मूल्यांकन" म्हटले जाते आणि त्यात स्पोर्ट क्लास व स्टेटसचा वाटप करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते
खेळाडू या क्रीडा प्रकारासाठी पात्र ठरतोय का?
पात्र खेळाडूची कमजोरी खेळाच्या किमान कमजोरी निकषांची पूर्तता करते का?
खेळाडू खेळातील मूलभूत कार्ये आणि क्रिया ज्या प्रमाणात पार पाडण्यास सक्षम आहे, त्या मर्यादेवर खेळाडूला कोणत्या क्रीडा प्रकारात खेळवले जावे?
Impaired Muscle Power - अशक्त स्नायू असलेल्या खेळाडूंना त्यांच्या स्नायूंची हालचाल करण्यासाठी किंवा शक्ती निर्माण करण्यासाठीची क्षमता मुळात कमी असते किंवा ती निकामी झालेली असते. एखाद्या खेळाडूच्या मणक्याला दुखापत झाली असेल, मस्क्यूलर डिस्ट्रोफी, पोलिओमुळे आलेले दिव्यांगत्व आदींचा यात समावेश असतो.
क्रीडापटूला एखाद्या खेळासाठी पात्र ठरवल्यानंतर पॅनेलद्वारे त्यांच्या कॅटेगरीचे वर्गीकरण केले जाते. पॅरा आइस हॉकी आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग आदी खेळांमध्ये एक कॅटगरी आहे. तेच धावणे, उडी मारणे, गोळाफेक, भालाफेक आदी प्रकारातील खेळाडूंसाठी ५० पेक्षा जास्त कॅटेगरी आहेत. त्यामुळे समान दिव्यांगत्व असलेल्या खेळाडूंना एकाच कॅटेगरीत निवडून फेअर प्ले स्पर्धा होते.
पॅरा खेळाडूंच्या कॅटेगरीबाबत अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला गोळाफेकीत रौप्यपदक जिंकून देणाऱ्या दीपा मलिक यांच्याशी संवाद साधला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या पाठीच्या कण्यात गाठ आढळली आणि त्यावर जवळपास तीन वर्ष उपचार सुरू होते. २९ वर्षांच्या असताना पुन्हा कण्यात गाठ आढळली आणि त्यावर पुन्हा तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, त्यानंतर त्यांच्या शरीराचा खालचा भाग निकामी झाला.
दीपा मलिक सांगतात, ''खेळाडूंसाठी समान मैदान म्हणजेच Equal play field साठी, निष्पक्ष स्पर्धा यासाठी दिव्यांगत्वाच्या व्याख्या ठरवल्या गेल्या आहेत. दिव्यांगत्वाचा प्रकार, शरीराच्या नेमक्या कोणत्या भागावर दिव्यांगत्व आहे, त्याचे नेमकं प्रमाण किती आणि मेडिकल एक्स्पर्ट काय म्हणतात... यावर पॅरा खेळाडूंची गटवारी ठरवली जाते. Visual, intelectual, polio, amputee, celebral policy, spinal code injury हे असेच बरेच प्रकार पाहिले जातात.''
''व्हिलचेअरमध्येच सात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. तुम्हाला खेळाडू व्हिलचेअरवर बसलाय म्हणजे तुम्ही त्याला त्या गटातील खेळाडू म्हणून ओळखता. पण, त्यातही क्वाड्रिप्लेजिया, Paraplegia असे अनेक विभाग आहे. मला स्वतःला पाठीच्या कण्याची दुखापत झाली आहे. पण, या दुखापतीमुळे तुमच्या स्नायूंची शक्ती किती गेली आहे, बॉडी बॅलेन्स किती गेला आहे हे पाहिलं जातं. ५१ कॅटगरीमध्ये क्वाड्रिया येतं जिथे हात अन् पोटाच कमकुवतपणा पाहिला जातो. ५२ मध्ये कोपऱ्याची स्थिती पाहिली जाते. मग ५३ मध्ये तुमचा खांदा, कोपरा, हात व्यवस्थित आहे, परंतु छातीपासूनचा खालचा भाग निकामी झाला आहे, हे पाहिले जाते. असे अनेक बारकावे पाहिले जाते,''असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या,''याच प्रकारे ६१, ६२, ६३, ६४ मध्ये यामध्ये पायाचे दिव्यांगत्व पाहिलं जाते. यात तुम्ही गुडघ्यापासून, गुडघ्याजवळ, मांडीपासून दिव्यांग आहात का, हे पाहिले जाते. त्यानंतर कॅटेगरी ठरते. आंतरराष्ट्रीय मेडिकल टीम जोपर्यंत तुमची तपासणी करत नाही आणि तोपर्यंत तुमची कॅटेगरी ठरत नाही. ही खेळाडूंची पहिली पायरी आहे. दिव्यांग खेळाडूंना त्यांची मेडिकल कॅटेगरी माहित असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर काय होतं, की तुम्ही चुकीच्या कॅटेगरीत खेळता आणि तुम्हाला पुढचा मार्ग मिळत नाही.''
मी सुरुवातीला स्विमिंग कॅटेगरीत खेळायचे.. तिथे पायाचा वापर न करणाऱ्या कॅटेगरीमध्ये मला खेळायला लावले. कारण, माझा शरीराचा खालचा भाग काम करत नाही. मी ३-४ वर्ष स्विमिंग केलं, परंतु यश काही हाती आलं नाही. माझ्या खांद्यावरही शस्त्रक्रिया झाल्या होत्या, परंतु फक्त माझे पाय निकामी झालेत म्हणून मला स्विमिंग करायला लावले. शस्त्रक्रिया हा भाग वेगळा, त्याशिवाय अनेक वैद्यकिय समस्या होत्या, ज्यामुळे पाण्यात उतरल्यावर माझं शरीर टाईट व्हायचं. स्विमिंग करताना मला शरीराकडून मदतच मिळवत नव्हती. या क्रीडा प्रकारासाठी आपण फिट नाही, हे समजण्यातचं माझी ३-४ वर्ष गेली. त्यानंतर मी अॅथलॅटिक्समध्ये भाग घेतला आणि मला ५३ कॅटेगरीमध्ये संधी दिली गेली. येथे मला माझ्यासारख्या लोकांसोबत खेळण्याची संधी मिळाली आणि मी चांगली कामगिरी करू शकली.
यामध्ये काय असतं की तुम्हाला तुमच्या शरीराच्या कोणत्याही दोन अवयवांचा वापर करण्याची मुभा दिली जाते. व्हिलचेअरवर जे खेळाडू आहेत, ज्यांचा शरीराचा खालचा भाग निकामी आहेत, ते हाताचा वापर करतात. शीतलने इथे मी पायांनी तिरंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिला मदत मिळावी यासाठी इथे थोडं नियमही बदलले गेले आहेत. असं केलं जाऊ शकतं. शीतल तीर आपल्या तोंडाने सोडते... जिथे अन्य प्रतिस्पर्धी बोटाने तीर सोडताना दिसत आहेत. तिच्यासारखे जगात तीन तिरंदाज झाले आहेत... शिवाय पायाने टेबल टेनिस खेळणारेही खेळाडू आहेत.
इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटीने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याबाबत मार्गदर्शन करणारे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. भारतीय पॅरालिम्पिक समितिच्या अध्यक्षपदावर असताना आम्ही हिंदीतून मार्गदर्शन करणारे असे व्हिडीओ तयार केले आहेत आणि सेमिनार घेतले होते.