एक बाप म्हणून काल माझं मन थरथर कापत होतं. ''बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला'' हे नुसतं वाचताना अंगावर काटा उभा राहिला, संतापाने डोक्यात तीव्र सणक गेली. डोळे अक्षरशः लालबूंद झाले होते.
तो नराधम समोर असता तर त्याचं काय केलं असतं याची कुणीही कल्पना करणार नाही अशी त्याला शिक्षा देण्याची इच्छा झाली होती. या दोन मुलींच्या आई-बापांच्या मनाची घालमेल मी समजू शकतो, कारण मी पण एका मुलीचा बाप आहे.
ही बातमी वाचली तेव्हा सर्वात आधी लेकीचा चेहरा डोळ्यासमोर आला. घरी पोहचून लेकीला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडावंसं वाटत होतं. ऑफिसमध्ये लक्ष काही लागेना... घरी पोहोचताच लेकीला मिठी मारली, परंतु रडण्यापासून स्वतःला आवरलं.
मला रडताना बघून लेकीच्या प्रश्नांची उत्तरं मी काय देऊ? तिला काय सांगणार, पोरी जग खूप वाईट आहे. पण, असं सांगणही धोक्याचे होते, कारण शितावरून भाताची परीक्षा घेण्यासारखं ते ठरलं असतं...