शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना मरण आलं. आपल्या सहकाऱ्यांना वाचवताना अंशुमन यांनी मात्र प्राण गमावले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र देण्यात आलं.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि त्यांचे आईवडील रवीप्रताप सिंह आणि मंजू सिंह आहेत. लग्नाला जेमतेम सहा महिने झालेले असतानाच स्मृती यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली.
राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्र स्वीकारताना स्मृती यांचा रडवेला चेहरा साऱ्यांनीच पाहिला. सर्वांनाच त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्यांना लष्कराकडून आर्थिक सहाय्य मिळालं तसंच त्यांना उत्तर प्रदेश सरकारनेही मदत जाहीर केली होती.