आपण दररोज अनेक गोष्टींचा वापर करतो, परंतु त्याची निर्मिती कशी होते, याबाबत माहिती असेलच असे नाही. उदा. भांड्याची घासणी, झाडू आणि एवढेच नाही तर काडीपेटी. सुमारे शंभर दीडशे वर्षाचा इतिहास लाभलेल्या काडीपेटीबद्धल लिहावे असे फारसे कोणाला वाटत नाही. कारण काडीपेटी ही मुळातच किरकोळ आणि नगण्य बाब मानली जाते आणि त्यावर काय लिहावे, असाही अनेकांना प्रश्न पडतो. परंतु याच काडीपेटीने वणवा पेटतो ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ग्रामीण भागातील एका वस्तीवर असलेल्या घरात दिसणारी काडीपेटी ही उच्चभ्रु भागातील एका आलिशान बंगल्यातही दिसते. कारण काडीपेटीची अनिवार्यता ही कधी न संपणारी नाही.
स्वयंपाकासाठी चूल पेटवण्यासाठी, देवासमोर दिवा लावण्यासाठी काडीपेटीचा उपयोग साधारणपणे केला जातो. याच काडीचा गैरवापरही केला गेला आहे. म्हणूनच काही जण मिश्किलीने ‘काडी’ टाकण्याचे काम करू नको, असेही म्हणतात. विनोदाचा भाग सोडा, काडीपेटीचे महत्त्व हे कधी न संपणारे नाही. काडीपेटीचे आकर्षण लहान मुलांनाही असते. कारण एका काडीतून निघणारी आग पाहताना त्यांना विलक्षण आनंद होतो. पण अपघात होण्याचाही तितकाच धोका असतो.म्हणूनच घरातील मंडळी मुलांना काडीपेटीपासून दूर ठेवतात. हीच काडीपेटी आता एक रुपयाने महाग होत आहे. आजच्या काळात एक रुपया ही किंमत खूपच कमी वाटत असली तरी उद्योजकांसाठी आणि कामगारांसाठी खूप अधिक आहे.