Investment Planning: उच्च शिक्षणापासून ते लग्नापर्यंत...; पालक असाल तर मुलांसाठी असे करा गुंतवणुकीचे नियोजन

Child Investment Planning: आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालावे, मुलांना आवडेल ते शिक्षण घेता यावे, उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविता यावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, अनेकांचे हे स्वप्न आर्थिक परिस्थितीमुळे अपुरे राहते.
Financial planning for parents these are some expert tips
Financial planning for parents these are some expert tips Sakal
Updated on

- विवेक जैन

Child Investment Planning: आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालावे, मुलांना आवडेल ते शिक्षण घेता यावे, उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविता यावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, अनेकांचे हे स्वप्न आर्थिक परिस्थितीमुळे अपुरे राहते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लग्न, इतर छंद, गरजेच्या गोष्टी यासाठी पालक आर्थिक तरतूद करण्यासाठी बचत करत असतात.

मात्र, अनेकदा आर्थिक उत्पन्न आणि भविष्यातील खर्च यांची सांगड घालणे कठीण होते. मुलांसाठी आवश्यक त्या टप्प्यावर योग्य आर्थिक निधी उपलब्ध व्हावा, त्यांना सर्वसमावेशक आर्थिक सुरक्षा प्रदान करता यावी, यासाठी लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे आवश्यक असते.

अशा गुंतवणुकीसाठी ‘चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे. त्याबाबत सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे. मुलांच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याची ही गुरुकिल्ली आहे.

लवकरात लवकर गुंतवणूक

मुलांसाठी उत्तम आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रत्येक पालकाने मुलाचा जन्म होताच गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे, कारण जितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल, तितके अधिक फायदे मिळतात. जितका उशीर होईल, तितकी अधिक गुंतवणूक करावी लागते आणि त्यामानाने परतावाही कमी मिळतो.

‘चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन’मध्ये, तर ३० दिवसांपेक्षा लहान मुलांसाठीदेखील गुंतवणूक सुरू करता येते. त्यामुळे या योजना मुलांच्या जन्मापासून गुंतवणुकीची सुविधा देतात. गुंतवणुकीचा हा मार्ग मुलाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एक भक्कम पाया प्रदान करतो.

योग्य पर्यायांची निवड महत्त्वाची

गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे उच्च शिक्षण किंवा लग्न यासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योग्य विचारपूर्वक नियोजन करणे. मुलांच्या शिक्षणासाठी मोठी रक्कम कधी लागणार आहे.

त्यावेळी शिक्षणाचा खर्च किती येऊ शकेल, कोणते शिक्षण घेणार आहे, कोणत्या ठिकाणी घेणार आहे, परदेशात जाणार असेल, तर तिथला शैक्षणिक आणि इतर खर्च किती असेल, अशा सर्व पैलूंचा विचार करून किती तरतूद आवश्यक आहे.

त्यासाठी आपल्या हातात किती कालावधी आहे आणि त्यानुसार किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे आणि यासाठी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, या सर्वांचा विचार करून गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे, तरच आपले उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य करणे शक्य होईल.

खर्चाचा वाढता आलेख

सध्याच्या काळात शैक्षणिक महागाई वार्षिक ९ ते १० टक्के दराने वाढत आहे, याचा अर्थ आज २० लाख रुपये असलेली कॉलेजची फी २० वर्षांनंतर सुमारे १.५ कोटी रुपये होईल. त्यामुळे २० वर्षांनंतर आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आपल्याकडे १.५ ते २ कोटी रुपयांची पुंजी जमा असणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने ‘चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन’मध्ये योग्य रक्कम गुंतविण्यास लवकरात लवकर सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांच्या उत्तम भविष्यासाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे सहजशक्य आहे.

Financial planning for parents these are some expert tips
Investment Planning: छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका गुंतवणूकीचे अर्थशास्त्र; असे करा जमा खर्चाचे नियोजन

परतावा व सुरक्षितता यांचा समतोल

आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परतावा आणि सुरक्षितता यांचा समतोल ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी गुंतवणुकीवर उच्च परतावा देणाऱ्या आणि बाजारातील चढ-उतारांचा परिणाम न होणाऱ्या हमी योजनांचा विचार करावा, ज्या ७.५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

या योजनांमध्ये, मुदतपूर्तीची रक्कम निश्चित केली जाते. तसेच यात पाच लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक प्रीमियम पूर्णपणे करमुक्त असतो. यामध्ये मार्केट-लिंक्ड पर्यायदेखील आहे, ज्यामध्ये युलिप किंवा युनिट-लिंक्ड गुंतवणूक योजनांचा विचार केला जाऊ शकतो.

या योजना अनुकूल बाजार परिस्थितीत १४ ते १५ टक्के परतावा देऊ शकतात. त्यामध्ये गुंतवणूक केल्याने वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी पुरेसे पैसे मिळण्यास मदत होईल. बाजारातील जोखीम घेण्याची तयारी असेल, तर या योजनांमधून चांगला फायदा मिळू शकतो.

त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्यादृष्टीने ‘चाइल्ड कॅपिटल गॅरंटी सोल्यूशन्स’ योजनांचीदेखील निवड करणेही गरजेचे आहे. या योजना पालकांच्या पश्चातही मुलांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करतात.

यात वार्षिक प्रीमियमच्या १० पट लाइफ कव्हर मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, भविष्यातील प्रीमियम माफ केले जातात. या प्रीमियमचा भार विमा कंपनी उचलते. त्यामुळे पॉलिसी पुढे सुरू राहते आणि मुदतपूर्तीनंतर मुलांना सर्व रक्कम मिळते.

यातील आयुर्विम्याच्या सुविधेमुळे, कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलतदेखील घेता येते. त्यामुळे या योजना आर्थिक कवचकुंडले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Financial planning for parents these are some expert tips
जगातील ‘टॉप टेन’ अर्थव्यवस्थेत भारत पहिल्या पाचमध्ये तर ‘टॉपटेन’ राज्यांमध्ये राज्यांच्या यादीत महाराष्ट्र या स्थानावर

मुलांच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी ‘चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ आणि ‘चाइल्ड कॅपिटल गॅरंटी सोल्यूशन्स’ योजनांची निवड करून त्यात लवकरात लवकर गुंतवणूक सुरू केल्यास पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च सहजपणे करू शकतात.

तसेच पालकांच्या पश्चातही त्यांच्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करणेही शक्य आहे. चांगला परतावा देणाऱ्या या योजना पालकांना आपल्या मुलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद देतील, यात शंका नाही.

(लेखक ‘पॉलिसीबझार डॉट कॉम’च्या गुंतवणूक विभागाचे प्रमुख आहेत.)

(शब्दांकनः प्राची गावस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.