हॅप्पी हार्मोन...

नियमित शारीरिक व्यायामाने आरोग्य सुधारते आणि त्यामुळे आपले मानसिक आणि भावनात्मक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
How physical exercise affects hormones in the body
How physical exercise affects hormones in the body sakal
Updated on

डॉ. नेहा गोगटे...

आजच्या वेगवान व तणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्यालाही महत्त्व देणे अतिशय गरजेचे आहे. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी अनेक पर्याय असतात, पण शारीरिक व्यायाम हा सर्वोत्तम पर्याय आहे.

नियमित शारीरिक व्यायामाने आरोग्य सुधारते आणि त्यामुळे आपले मानसिक आणि भावनात्मक आरोग्य सुधारण्यास मदत होते. शारीरिक व्यायामाचा शरीरातील हार्मोनवर कसा प्रभाव पडतो आणि त्याचा आपल्या भावनांवर कसा परिणाम होतो, ते पाहू.

शरीरातील विविध ग्रंथींद्वारे तयार होणाऱ्‍या रसायनांना हार्मोन किंवा संप्रेरके असे म्हणतात. हे हार्मोन रक्तवाहिन्यांतून शरीरात जातात. मेंदूच्या संदेशवाहकाचे काम हार्मोन करतात. शरीराच्या अनेक प्रक्रियांमध्येदेखील हार्मोन समाविष्ट होतात.

‘सेरोटोनिन’, ‘एन्डॉर्फिन’, ‘डोपामाईन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ हे चार हार्मोन ‘हॅपी हार्मोन’ म्हणून ओळखले जातात. हे हार्मोन सकारात्मक विचार आणण्यास, आपले मन आनंदी व उत्साही ठेवण्यास मदत करतात. 

एन्डॉर्फिन

शारीरिक व्यायाम करण्याने एन्डॉर्फिन हार्मोन स्रवते. एन्डॉर्फिनच्या प्रभावामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते. एन्डॉर्फिनमध्ये तणाव, चिंता आणि नैराश्याची लक्षणे दूर करण्याची क्षमता असते व ते शांतता आणि सुदृढतेची भावना निर्माण करू शकतात.

धावणे, सायकलिंग, नृत्य करणे यांसारख्या शारीरिक व्यायामांमुळे एन्डॉर्फिन तयार होते. धावल्यामुळे एखाद्या धावपटूला जी आनंदाची भावना जाणवते, त्या भावनेला ‘रनर्स हाय’ (Runner’s High) असे म्हटले जाते. व्यायामामुळे मिळणाऱ्या या आनंदाला एन्डॉर्फिन हेच कारण आहे!

सेरोटोनिन

सेरोटोनिनमुळे सुख आणि आनंदाच्या भावना नियंत्रित केल्या जातात. नियमित शारीरिक व्यायामामुळे शरीरात सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. सेरोटोनिन भूक लागण्यास, गाढ झोप लागण्यास व आणखी काही महत्त्वाच्या कामांमध्ये मदत होते. चांगला व्यायाम केल्यावर रात्री गाढ झोप लागल्याने हार्मोन सक्रिय राहतात. त्यामुळे मूड चांगला आणि आनंदी राहतो.

नियमित व्यायामाची सवय असेल तर सेरोटोनिनचे प्रमाण अधिक राहते व मूड आनंदी राहण्यास मदत होते. सकाळी कोवळ्या उन्हामध्ये केलेल्या व्यायामामुळे मिळणाऱ्या सेरोटोनिनचे प्रमाण दिवसातल्या अन्य वेळी केलेल्या व्यायामामुळे मिळणाऱ्‍या सेरोटोनिनच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, असे शास्त्रज्ञ म्हणतात.

डोपामाइन

डोपामाइनमुळे मनात सुख, आनंद आणि प्रितीची भावना निर्माण होते. डोपामाइन हार्मोनची कमतरता असल्यास पुढील काही गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात- १) सतर्कतेचा अभाव २) लक्ष केंद्रित करण्यात अडचणी ३) एकंदरीत उत्साह कमी होणे ४) हालचाली करण्यात त्रास होणे ५) समन्वय (Coordination) कमी होणे.

How physical exercise affects hormones in the body
हॅप्पी पेरेंटिंग : भावंडांतील भांडण

ऑक्सिटोसिन

बऱ्याच वेळा एकट्या राहणाऱ्या लोकांमध्ये या हार्मोनची कमतरता आढळते. आपल्या जवळच्या व्यक्तींना साधी मिठी जरी मारली तरी ऑक्सिटोसिन स्रवते. एकट्याने व्यायाम करण्याऐवजी पार्टनरबरोबर केलेल्या व्यायामाने ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढू शकते.

खेळानंतर पार्टनरसोबत स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरू शकते. टीम स्पोर्ट, ग्रुप क्लास किंवा पार्टनर योगा अशा प्रकारचे व्यायाम केल्याने या हार्मोनचे प्रमाण शरीरात वाढते.

हॅपी हार्मोन वाढविण्यासाठी...

शारीरिक व्यायाम केल्याने हॅपी हार्मोनमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, व्यायाम नियमित आणि योग्य इन्टेन्सिटीने करायला हवा. जॉगिंग, पोहणे किंवा नृत्य अशा एरोबिक व्यायामाबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. योगासने व प्राणायामामुळे मन एकाग्र होण्यास व चित्त स्थिर होण्यासाठी मदत होते.

घराबाहेर आणि निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करणे अधिक फायदेशीर ठरते. तर कुटुंबासोबत, जोडीदार व मित्रांसह चांगला वेळ घालवणे, मसाज थेरपिस्टकडून बॉडी मसाज घेणे, निसर्गात वेळ घालवणे, आवडती गाणी ऐकणे, ध्यान करणे, विविध रिलॅक्सेशन तंत्रांचा सराव करणे, या सगळ्या गोष्टींमुळे हॅपी हार्मोन स्रवतात व मूड चांगला राहतो.

काही वेळा ताणावर उपाय म्हणून घेतली जाणारी औषधे हॅपी हार्मोनचे परिणाम कृत्रिमरित्या वाढवतात. त्या गोळ्यांचे साइड इफेक्ट मात्र नंतरसुद्धा सहन करावे लागतात. व्यायाम हॅपी हार्मोन अगदी नैसर्गिकरित्या वाढवतो व अर्थातच शून्य साइड इफेक्टसहित! म्हणूनच ताणावरील सर्वोत्तम गोळी व्यायामच होय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.