युगांक गोयल
पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे निधन झाले. अर्थव्यवस्थेसह अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय विद्वत्तापूर्ण योगदान दिले. ‘जिल्हा गॅझेटियर’च्या प्रकल्पात त्यांनी माझ्या अडचणी तर दूर केल्याच परंतु या कामाचे महत्त्व मला पटवून दिले. देशातील ‘गॅझेटियर’ प्रकल्पाबाबत त्यांना दिलेला शब्द मी पाळल्याने त्यांना झालेला मनापासून आनंद त्यांनी जाहीर व्यक्त केला. ही माझ्या आजवरच्या कामाची सर्वांत मोठी पोचपावती आहे.
गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे निधन झाले. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. देशातील अग्रगण्य विद्वानांमध्ये त्यांचा समावेश होत असे. चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभलेल्या देबरॉय यांचे अर्थशास्त्राशिवाय अन्य अनेक क्षेत्रांत योगदान आहे. संस्कृत, इतिहास आणि संस्कृतीसह अनेक क्षेत्रांत त्यांचे कार्य होते. व्यापार, विधिसुधारणा आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील धोरणकर्ते म्हणून त्यांनी केलेल्या कामासह महाभारत, पुराण आणि अन्य अनेक प्राचीन ग्रंथांचे अनुवादक म्हणून त्यांनी उभ्या केलेल्या कामामुळे ते लाखो भारतीयांपर्यंत पोहोचले आहेत.