आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत वेध लागतात ते प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्स वाचवण्याचे! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज (सध्या ७.१ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळे या योजनेची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. या योजनेबाबत जाणून घेऊया.
गुंतवणुकीचे कितीही नवनवीन पर्याय आले तरीही जुने विश्वासार्ह पर्याय गुंतवणूकदारांना कायमच जवळचे वाटतात. दीर्घकालीन गुंतवणूक, करमुक्त परतावा, सर्वोच्च सुरक्षितता, कर्जाची सोय, प्राप्तिकरातून सवलत हे सर्व फायदे असलेला सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात ‘पीपीएफ’ हा असाच एक भरवशाचा गुंतवणूक पर्याय आहे. सुरक्षिततेच्या भक्कम कवचामुळे लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारातील व्याजदरांशी सुसंगत ठेवण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे दर तीन महिन्यांनी त्यांचा आढावा घेतला जातो. चालू आर्थिक वर्षात सरकारने या व्याजदरात बदल केलेले नाहीत. बॅंकांतील ठेवींचे व्याजदरही कमीच झालेले आहेत. त्यातुलनेत विचार करता, अल्पबचत योजनांचे व्याजदर थोडे बरे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. (PPF Tax Benefits & Features)