सेक्शन : थेट-भेट
ए. मणिमेखलाई
आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत नफ्याच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वांत मोठी बँक बनण्याचे उद्दिष्ट युनियन बँक आॅफ इंडियाने निश्चित केल्याचे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. मणिमेखलाई यांनी सांगितले.
शिवाय, बँकेचा डिजिटायझेशनचा प्रवास चांगला विकसित होत असून, ‘व्योम’ मोबाइल ॲपच्या वापरकर्त्यामध्ये वाढ दिसत आहे.
यामुळे नजीकच्या काळात बँकेच्या ‘कासा’ ठेवींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.
युनियन बँक आॅफ इंडियाचे आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. बँकेला मिळालेल्या व्याज उत्पन्नात ६.२६ टक्के, तर बँकेच्या निव्वळ नफ्यात ६० टक्के वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत नफ्याच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वांत मोठी बँक बनण्याचे उद्दिष्ट युनियन बँकेने निश्चित केल्याचे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. मणिमेखलाई यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेल्या बातचितीचा हा सारांश.
प्रश्नः मागील आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ केली. वाढीमुळे बँकेला कर्जदरात वाढ करावी लागली. या वाढीचा तुमच्या व्याजाच्या उत्पन्नावर कसा परिणाम झाला?
मणिमेखलाईः रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या २.५ टक्क्यांच्या वाढीपैकी संपूर्ण दरवाढ आमच्या रिटेल आणि एमएसएमई ग्राहकांकडे संक्रमित केली आहे.
ज्या कॉर्पोरेट ग्राहकांची कर्जावरील व्याज आकारणी MCLR पद्दतीने होते, त्यांच्या-त्यांच्या व्याजदरात १.४० टक्के वाढ आम्ही कर्जदारांवर लादली आहे.
आमच्या एकूण कर्ज वितरणापैकी ५० टक्के कर्जे एमसीएलआर-पद्धतीने व्याजआकारणी होणारी आहेत. २४ टक्के कर्जे ही बाह्य मानदंडाशी निगडीत (EBLR) असून, उर्वरित कर्जे ही आमच्या व्याजदरानुसार व्याजआकारणी होणारी कर्जे आहेत.
आमच्या MCLR कर्जांपैकी ५० टक्के कर्जांचे पुनर्मूल्यांकन (रीसेट) केले जाते. या वर्षी ४०-४५ टक्के कर्जांचे आतापर्यंत पुनर्मूल्यांकन केले असून, उर्वरित कर्जांचे पुनर्मूल्यांकन वर्षअखेरीपर्यंत होईल.
वर्षअखेरीपर्यंत सुमारे २.८० लाख कोटी कर्जांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. याचा परिणाम आमच्या व्याजाच्या उत्पन्नात दिसत असून, बँकेला मिळालेल्या व्याजउत्पन्नात ६.२६ टक्के, तर बँकेच्या निव्वळ नफ्यात ६० टक्के वाढ झाली आहे.
आमच्या व्याजदराच्या फरकात (NIM) कोणतीही घट दिसत नाही. सध्याच्या वर्षात EBLR कर्जांच्या व्याजदरात वाढ केलेली नसून, EBLR कर्जांचे व्याजदर स्थिर होताना दिसत आहेत. परंतु आमच्या MCLR कर्जांच्या व्याजदरात आम्ही रिझर्व्ह बँकेच्या रणनीतीनुसार बदल करू.
प्रश्नः तुम्ही मोठ्या प्रमाणात कंपन्यांना (कॉर्पोरेट लोन) कर्ज मंजूर करीत आहात. सर्वाधिक थकबाकी या प्रकारच्या कर्जात असते. या कर्जप्रकाराकडे तुम्ही कसे पाहता?
मणिमेखलाईः मार्च २०२४ पर्यंत, आम्ही कंपन्यांना दिलेल्या कर्जांनी रू. साडेआठ लाख कोटींचा टप्पा ओलांडणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये RAM (किरकोळ, कृषी, एमएसएमइ) आणि कॉर्पोरेट कर्जे यांचे प्रमाण ५५:४५ होते. आमचे कॉर्पोरेट कर्जवितरण वाढत आहे.
आमच्याकडे सुमारे ३५ हजार कोटींची मंजुरी दिलेली; परंतु वितरीत न झालेली कर्जप्रकरणे आहेत. आम्ही आमच्या ठेवींवरील व्याज वाढविले नाही, तर आम्हाला आमच्या MCLR कर्ज व्याजदरात वाढ करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आम्ही किमान ३ टक्के ‘एनआयएम’ राखता आले पाहिजे.
प्रश्नः तुमच्या CASA (चालू खाते, बचत खाते) प्रमाणात ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ च्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत घसरण झालेली दिसत आहे, तर ठेवींमध्ये वाढ झालेली दिसते. एका बाजूला ‘कासा’त घट आणि मुदत ठेवींमध्ये वाढ असे चित्र का दिसते?
मणिमेखलाईः मागील वर्षात मुदत ठेवींच्या व्याजदरात झालेली वाढ ही ‘कासा’च्या घसरणीस कारण ठरली. बचत आणि चालू खात्यातील शिल्लक रक्कम मुदत ठेवींमध्ये संक्रमित झाल्याने ‘कासा’मध्ये घट, तर मुदत ठेवींमध्ये वाढ झालेली दिसत आहे.
ज्या ज्या वेळेला मुदत ठेवींचे दर वाढतात, त्या त्या वेळी ‘कासा’ कमी होतो. केवळ सेवा आणि आम्ही ग्राहकांशी राखलेले नाते हेच ‘कासा’ तयार करण्यास मदत करते. मागील आर्थिक वर्षात आम्ही ‘कासा’मध्ये मोठी वाढ केली.
या नऊ महिन्यांत आम्ही ‘कासा’ ठेवीं वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्याही व्यापारी बँकेसाठी ‘कासा’ ठेवी हा महत्त्वाचा घटक असतो.
आम्ही पगारदार, ‘एचएनआय’ ‘एनआरआय’ जे ‘कासा’ ठेवी वाढविण्यास कारणीभूत ठरतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या नव्या योजना आणल्या आहेत. महानगरे, शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात आमच्या ८५८० शाखा आहेत.
शिवाय, ज्या ठिकाणी शाखा उघडणे शक्य नाही, आशा ग्रामीण भागात बँकिंग सेवा पुरवणारे जवळपास १७,८०० बँकिंग प्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही आमच्या १४ कोटी ग्राहकांपर्यंत पोचलो आहोत. आमच्याकडे सात कोटी सक्रीय ग्राहक आहेत.
शिवाय, आमचा डिजिटायझेशनचा प्रवास चांगला विकसित होत असून, आमच्या ‘व्योम’ मोबाइल ॲपच्या वापरकर्त्यामध्ये वाढ दिसत आहे. यामुळे नजीकच्या काळात आमच्या ‘कासा’ ठेवींमध्ये मोठी वाढ होईल.
प्रश्नः वर्ष २०२५ साठी तुमचे थकीत कर्जवसुलीचे धोरण कसे असेल?
मणिमेखलाईः आम्ही आर्थिक वर्ष २४ मध्ये एकूण रू. २२ हजार कोटींची थकीत कर्जवसुली करू. त्यामुळे आमच्या अनुत्पादित कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण ६ टक्यांपेक्षा कमी असेल.
आमच्या ‘रिटन-ऑफ’ खात्यांवर आमचे लक्ष असून, आमचा ‘रिटन-ऑफ’ खात्यांचा पोर्टफोलिओ रू. ७०००० कोटींचा आहे.
हा पोर्टफोलिओ पुढील तीन वर्षांत निम्म्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. मागील तीन वर्षांत आमच्या थकीत कर्जवसुली, निर्लेखित केलेली कर्जे (रिटन-ऑफ) आणि स्लिपेजेस यांमध्ये मोठी सुधारणा केली असून, हीच रणनीती आम्ही पुढील वर्षीही सुरु ठेवू.
प्रश्नः तुमच्या ‘गोल्ड लोन पोर्टफोलिओ’मध्ये चांगली वाढ दिसली आहे. याबद्दल काय सांगाल?
मणिमेखलाईः आमच्या सोनेतारण कर्ज पोर्टफोलिओमध्ये आम्ही आर्थिक वर्ष २०२४ मध्ये खूप चांगली कामगिरी केली.
आमच्या सोनेतारण कर्जामध्ये सुमारे ४८ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये आमचे सोनेतारण कर्ज रू. ३३ हजार कोटींचे होते. डिसेंबर २०२३ मध्ये रू. ५० हजार कोटींपेक्षा जास्त सोनेतारण कर्जवाटप केले आहे.
आम्ही १३३१ गोल्ड लोन पॉइंट उघडले आहेत. सोनेतारण कर्ज प्रकारात कर्जाची थकबाकी जवळजवळ शून्य असल्याने बँकांसाठी हा चांगला कर्जप्रकार आहे.
-‘‘महानगरे, शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात आमच्या ८५८० शाखा आहेत. शिवाय, ज्या ठिकाणी शाखा उघडणे शक्य नाही, आशा ग्रामीण भागात बँकिंग सेवा पुरवणारे जवळपास १७,८०० बँकिंग प्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही आमच्या १४ कोटी ग्राहकांपर्यंत पोचलो आहोत.
आमच्याकडे सात कोटी सक्रीय ग्राहक आहेत. शिवाय, आमचा डिजिटायझेशनचा प्रवास चांगला विकसित होत असून, आमच्या ‘व्योम’ मोबाइल ॲपच्या वापरकर्त्यामध्ये वाढ दिसत आहे.
यामुळे नजीकच्या काळात आमच्या ‘कासा’ ठेवींमध्ये मोठी वाढ होईल.’’
- ए. मणिमेखलाई, व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, युनियन बँक आॅफ इंडिया
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.