स्टार्टअप म्हणजे काय? कसे काम करते? कशी करावी सुरुवात?
- प्रा. डॉ. रामदास लाड
गेल्या चार पाच वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात एक शब्द नेहमी ऐकायला मिळतोय. तो म्हणजे स्टार्ट अप. पण, स्टार्ट अप आहे तरी काय? कशाला स्टार्ट म्हणायचे? ते कधी व कसे करायचे? ते कसे काम करते? असे असंख्य प्रश्न मनात रुंजी घालत असतात. त्यांचीच सोडवणूक करण्यासाठी स्टार्ट अप क्षेत्राचे अभ्यासक, मार्गदर्शक व आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. रामदास लाड यांच्याशी संवाद साधला. त्यातून स्टार्ट अप बाबतच्या सर्व शंकांचे निरसन झाले. प्रा. लाड म्हणतात, “स्टार्ट अपची सुरुवात ही सामाजिक गरजेतून, समस्या निराकरण, वैयक्तिक गरजेतून झालेली आपणास दिसून येते. यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. तसेच यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भविषयामध्ये यात खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.”
स्टार्टअप म्हणजे काय?
स्टार्ट अप म्हणजे एखादे नविनतम उत्पादन अथवा सेवा किंवा प्रचलित उत्पादन अथवा सेवा वेगळ्या पद्धतीने ग्राहकांसमोर मांडणे होय. स्टार्टअप्सचे मूळ नावीन्यतेमध्ये आहे, अस्तित्वात असलेल्या उत्पादनांची कमतरता दूर करणे किंवा वस्तू आणि सेवांच्या पूर्णपणे नवीन श्रेणी तयार करणे होय.