मृत्यू झाल्यास, फक्त पत्नी आणि मुलांनाच विम्याचे पैसे मिळतील; पहा कोणत्या कायद्यात अशी तरतूद

देशात कुटुंब आणि स्त्रियांचे हक्क अबाधित राखण्यासाठी काही विशेष कायदे तयार करण्यात आले आहेत
married women property act
married women property actEsakal
Updated on

सेक्शन : विमा

किरांग गांधी
आर्थिक नियोजन आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता ही गुंतागुंतीची आणि अवघड बाब आहे. आर्थिक नियोजनाचा विचार करत असताना आपल्या देशात कुटुंब आणि स्त्रियांचे हक्क अबाधित राखण्यासाठी काही विशेष कायदे तयार करण्यात आले आहेत.

‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’ हा त्यापैकीच एक महत्त्वाचा कायदा. हा कायदा आणि टर्म इन्शुरन्स या दोन गोष्टींचा एकत्रितपणे विचार केल्यास कुटुंबाच्या आर्थिक भवितव्यासाठी त्याचा सकारात्मक फायदा होऊ शकतो.

या कायद्याचे बारकावे; तसेच टर्म इन्शुरन्स घेतल्यास या कायद्यामुळे कुटुंबाचं आर्थिक भवितव्य कसे सुरक्षित करता येते, हे आपण जाणून घेऊ या.

अलीकडच्या काळात अनेक ब्रिटीशकालीन कायदे बदलण्यात आले आहेत. कालानुरुप या कायद्यात बदल करणे आवश्‍यक असल्याने सरकारने जुने कायदे रद्दबातल करून नवे कायदे तयार केले आहेत.

ब्रिटीश काळातील काही कायद्यांपैकी एक म्हणजे ‘विवाहित महिला संपत्ती कायदा-१८७४’ म्हणजेच (एमडब्लूपीए-MWPA) ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’.

तुमच्या विम्याचे पैसे नातेवाईक घेऊ शकत नाहीत, असे सांगणारा हा ब्रिटीशकालीन कायदा पत्नी आणि मुलांचे संरक्षण कवच आहे. हा कायदा १८७४ मध्ये करण्यात आला होता.

तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स या कायद्याच्या कक्षेत घेत असाल, तर तुमचा मृत्यू झाल्यास, फक्त तुमची पत्नी आणि मुलांनाच विम्याचे पैसे मिळतील; अन्य कोणी नातेवाईक ते हडप करू शकणार नाहीत किंवा कोणतीही बँक किंवा वित्तीय कंपनी ते जप्त करू शकणार नाही.

‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’ समजून घेताना...

बँक, सावकार आणि इतर नातेवाईकांपासून विवाहित महिलांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात हा कायदा तयार करण्यात आला होता.

एखाद्या व्यक्तीने आयुर्विमा उतरवला असेल आणि त्या विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम विमाधारकाच्या कुटुंबाला देते. कर्जदारास दाव्याच्या रकमेतून त्याची रक्कम फेडून घेण्याचा अधिकार असतो.

अशा परिस्थितीत आपल्या मृत्यूनंतर कुटुंबास आर्थिक सुरक्षितता देणे ही विवाहित पुरुषाची जबाबदारी आहे. यात आयुर्विमा पॉलिसी महत्त्वाची ठरू शकते. मात्र, ही पॉलिसी ‘विवाहित महिला संपत्ती कायदा-१८७४’ (एमडब्ल्यूपीए अॅक्ट) अंतर्गत खरेदी करायला हवी.

टर्म इन्शुरन्स आणि ‘एमडब्ल्यूपीए’

टर्म इन्शुरन्स ही थेट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असते, ज्यात पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीचा पॉलिसीच्या टर्ममध्ये अवेळी मृत्यू झाल्यास कव्हरेजची रक्कम मृताच्या नातेवाईकाला दिली जाते.

परंतु, ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’च्या (एमडब्ल्यूपी) अंतर्गत टर्म इन्शुरन्स घेतलेला असल्यास, त्या टर्म इन्शुरन्समुळे त्या व्यक्तीची पत्नी आणि मुले आर्थिक बाबतीत आश्र्वस्त होतात.

याचाच अर्थ असा, की टर्म इन्शुरन्समधून मिळालेली कव्हरेजची रक्कम ही त्या व्यक्तीच्या संपत्तीचा भाग म्हणून ग्राह्य धरली जात नाही, तर ती त्या व्यक्तीच्या पत्नी किंवा मुलाची संपत्ती समजली जाते.

‘एमडब्ल्यूपी’ अॅक्टचा लाभ घ्यायचा असेल, तर पॉलिसीच्या प्रस्ताव अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. प्रत्येक प्लॅनसाठी ही सुविधा लागू होत नाही. विवाहित पुरुषच याचा वापर करू शकतात.

‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’चे संरक्षण असल्यामुळे टर्म इन्शुरन्स घेणे हे पत्नी आणि कुटुंबाच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. त्यातून कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होण्यास मदत होते.

पत्नी आणि मुलगा यांना भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी टर्म इन्शुरन्स आवश्यक ठरतो. पॉलिसीधारकाने हयात असताना कोणतेही कर्ज किंवा उधारी घेतलेली असल्यास त्याची झळ त्याच्या पत्नीला आणि मुलाला बसत नाही.

म्हणूनच सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात कुटुंबाचे आर्थिक हित जपण्यासाठी टर्म इन्शुरन्स हे अत्यंत महत्त्वाचे आर्थिक साधन आहे.

टर्म इन्शुरन्स घेत असताना ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’ विचारात घेऊन या दोघांची सांगड घातलेली असल्यास आपल्या जाण्यानंतर आपले कुटुंब आर्थिक संकटात सापडणार नाही, याची खात्री करता येते.


married women property act
Health Insurance News: भारतात काढलेला आरोग्यविमा परदेशात आजारी पडल्यास उपयोगी असतो?

दोहोंचे एकत्रित फायदे


कुटुंबाची आर्थिक सुरक्षा :
‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’ आणि टर्म इन्शुरन्स या दोन गोष्टींची गोळाबेरीज केल्यास विवाहित महिला आणि तिच्या मुलाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होण्यास मदत होते.

टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीचा अवेळी मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्समधील ‘सम ॲश्युअर्ड’ ही त्या व्यक्तीच्या पत्नीला किंवा मुलाला थेट हस्तांतरित केली जाते.

पतीने कोणतेही कर्ज किंवा उधारी घेतलेली असेल, तरी त्या संपत्तीवर कर्ज देणाऱ्या संस्थेला हक्क सांगता येत नाही.


कर्ज देणाऱ्या संस्थांपासून संरक्षण : पॉलिसीची रक्कम ही पतीची संपत्ती मानली जात नाही, त्यामुळे त्याने घेतलेले कर्ज किंवा उधारीचा पॉलिसीच्या रकमेचा काहीही संबंध नसतो. म्हणजे पतीने कोणतेही कर्ज घेतलेले असल्यास किंवा त्याला व्यवसायात तोटा झालेला असल्यास त्याच्या कर्जाचा भार कुटुंबावर येत नाही.


आर्थिक सुरक्षा : पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचे अकाली निधन झाल्यास टर्म इन्शुरन्समुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा अबाधित राहते. ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’मधील तरतुदी कुटुंबाच्या आर्थिक हिताचे रक्षण करतात.


सुलभ प्रक्रिया : ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’चा वापर करून टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया फारशी अवघड नाही.


मानसिक स्थैर्य : आपण टर्म इन्शुरन्स घेतलेले असल्यास ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’मुळे आपल्या पत्नी आणि मुलाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित आहे, ही जाणीव पॉलिसीधारकाला असते. त्यामुळे आर्थिक जोखीम पत्करून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘मॅरीड वूमन्स प्रॉपर्टी ॲक्ट’ आणि टर्म इन्शुरन्स या दोन्ही गोष्टी मानसिक स्थैर्य देणाऱ्या ठरतात.


कायद्याचे संरक्षण : एखाद्या संकटाच्या प्रसंगी किंवा आर्थिक बाबतीत कोर्टकचेरी झाल्यास इन्शुरन्समधून कुटुंबाला मिळणाऱ्या रकमेवर कोर्टाची जप्ती येण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यावर त्या व्यक्तीच्या पत्नीचा किंवा मुलाचा हक्क असतो.


मालकीहक्क आणि नियंत्रण : टर्म इन्शुरन्स पॉलिसीवर मालकी सांगण्याचा आणि ती पॉलिसी नियंत्रित करण्याचा हक्क पॉलिसीधारकाच्या पत्नीला दिला जातो. कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने तो इन्शुरन्स वापरला जाईल, याची खबरदारी घेतली जाते.

(लेखक अनुभवी आर्थिक मेंटॉर आहेत. पर्सनल फायनान्स क्षेत्राचा त्यांना २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. मोबाईल ९०२८१४२१५५)
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.