Startup News : जागतिक पातळीवर युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये भारत कितव्या स्थानावर? अमेरिकेनंतर कोणाचे नाव?

स्टार्ट-अपच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष चांगले म्हणता येण्यासारखे नव्हते..
start-up in india and pune
start-up in india and pune esakal
Updated on

स्टार्ट-अप

सलील उरुणकर
urunkar.salil४@gmail.com


मागील काही वर्षांत सहजरित्या व मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याची सवय भारतीय स्टार्ट-अप व नवउद्योजकांना झाली होती.

मात्र, जागतिक पातळीवर विविध कारणांमुळे असलेली अस्थिरता, महागाई नियंत्रणात आणण्यात आलेले अपयश आणि मंदीसदृश परिस्थिती यामुळे अमेरिकेसह अनेक देशांतील गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. साहजिकच, आता अनेक स्टार्ट-अपना भांडवल उभारणीसाठी झगडावे लागत आहे.

जगातील ‘स्टार्ट-अप हब’ अशी ओळख असलेल्या आपल्या देशात स्टार्ट-अप परिसंस्था वेगाने विकसित झाली आहे.

अनेक स्टार्ट-अपना जगभरातून गुंतवणूक मिळत आहे. मात्र, जगभरातील सध्याच्या अस्तिर वातावरणामुळे स्टार्ट-अपमधील गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. त्यादृष्टीने २०२३ हे वर्ष स्टार्ट-अपसाठी फारसे चांगले ठरले नाही.

स्टार्ट-अपना गुंतवणूक मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. गुंतवणूकदार आणि स्टार्ट-अपच्या परिभाषेत याला ‘फंडिंग विंटर’ असे म्हणतात.

या काळात ‘व्हेंचर कॅपिटॅलिस्ट’ किंवा ‘प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर’ हे नव्या गुंतवणुकीसाठी अनुकूल नसतात, तर काहीजण त्यांनी पूर्वीच गुंतवणूक केलेल्या स्टार्ट-अपमध्ये पुन्हा वाढीव गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवतात.

मात्र, हेसुद्धा करताना ते संबंधित स्टार्ट-अप कंपनी ही ‘प्रॉफिटेबल’ म्हणजेच नफा मिळविण्याच्या मार्गावर आहे किंवा नाही, हे तपासूनच निर्णय घेत आहेत. त्यामुळे केवळ कोणते तरी तंत्रज्ञान नवे आहे किंवा माहोल निर्माण झाला आहे म्हणून गुंतवणूक करण्याचे किंवा मिळविण्याचे दिवस गेल्यातच जमा आहेत.


‘सॉफ्टवेअर अॅज ए सर्व्हिस’ म्हणजे ‘सॅस’ क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी चालविणाऱ्या एका नवउद्योजकाला मागील वर्षी फंडिंग मिळण्याची अपेक्षा होती. प्रचंड मेहनती, अभ्यासू असलेल्या या नवउद्योजकाच्या ओळखी, नेटवर्कही तितकेच मोठे होते.

इन्व्हेस्टरबरोबर चालणाऱ्या वाटाघाटी, चर्चा अशा सर्वच बाबींमध्ये ते सरस होते. अनेक इन्व्हेस्टरबरोबरची डील अंतिम टप्प्यात आली; पण फंडिंगची रक्कम काही केल्या बँकेत जमा झाली नाही.

अखेरीस जानेवारी २०२४ महिन्याच्या शेवटी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली. एका अनुभवी आणि संयमी असलेल्या या नवउद्योजकाच्या बाबतीत हे घडले; तसेच अन्य नवउद्योजकांनाही असाच अनुभव मागील वर्षी आला असणार.

मात्र, किती जणांनी संयम ठेवला असेल किंवा निधीअभावी टिकाव धरला असेल, याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल.

स्टार्ट-अपची कामगिरी

स्टार्ट-अपच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष चांगले म्हणता येण्यासारखे नव्हते. संपूर्ण वर्षात भारतामध्ये फक्त दोन स्टार्ट-अप (इनक्रेड आणि झेप्टो) ‘युनिकॉर्न’ म्हणजे एक अब्ज डॉलर (साधारणतः आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) व्हॅल्यूएशनला पोचल्या.

हा आकडा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत कमी आहे. जागतिक पातळीवरचा विचार करायचा झाला, तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेमध्ये ६५० हून अधिक, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये १७२ हून अधिक, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतामध्ये २०२३ अखेरीस ११२ युनिकॉर्न स्टार्ट-अप आहेत.

भारतातील प्रमुख शहरे म्हणजे ‘स्टार्ट-अप हब’चा विचार केला, तर बंगळूरने २०२३ मध्येही प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बंगळूरमधील ४३३ स्टार्ट-अपने सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली आहे. भारतातील स्टार्ट-अपमध्ये २०२३ मध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ही सुमारे ५० टक्के रक्कम आहे.

बंगळूरपाठोपाठ दिल्ली-एनसीआर येथील २१७ स्टार्ट-अपने २२ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळवली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईमध्ये १२,५०० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

पुण्यातील स्टार्ट-अपने २०२३ मध्ये झालेल्या ३५ डीलच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली. २०२२ मध्ये हा आकडा साडेआठ हजार कोटी रुपयांच्या पुढे होता, अशी माहिती स्टार्ट-अप डेटा इंटलिजन्स प्लॅटफॉर्म ‘द क्रेडिबल’ने जाहीर केली आहे.

फिनटेक, गेमिंग स्टार्ट-अपला फटका

राष्ट्रीय पातळीवर एज्यू-टेक क्षेत्रासह फिन-टेक आणि गेमिंग स्टार्ट-अपला सर्वाधिक फटका २०२३ मध्ये बसला आहे. रिझर्व्ह बँकेने ‘बीएनपीएल’ कंपन्यांसाठी जारी केलेल्या नियमावलीमुळे पेटीएम, झेस्टमनी अशा कंपन्यांना फटका बसला, तर रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म स्टार्ट-अपला २८ टक्के ‘जीएसटी’ लागू केल्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या.

त्यामुळे अनेकांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. पुण्यातील स्टार्ट-अपमध्ये २०२२ मध्ये झालेल्या फंडिंगच्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचेही आकडेवारीतून दिसत आहे. भारतातील स्टार्ट-अपच्या एकूण फंडिंगपैकी पुण्यातील स्टार्ट-अपचा वाटा फक्त ३.१९ टक्के एवढाच होता.

ही सर्व आकडेवारी नकारात्मक वातावरण निर्माण करणारी असली, तरी नवउद्योजकांनी आणि स्टार्ट-अप क्षेत्रात काम करणारे याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. स्टार्ट-अपमध्ये, विशेषतः ई-कॉमर्स व एड-टेक या क्षेत्रातील नव्या कंपन्यांमध्ये होणारी ‘अंदाधुंद’ फंडिंग आता थांबली आहे.

केवळ ग्राहकवर्ग मोठा आहे किंवा पैसे खर्च करण्याची क्षमता असलेला आहे, या एकाच गोष्टीकडे लक्ष देऊन केलेली ही गुंतवणूक आता बऱ्याच अंशी बुडित जमा झालेली आहे. या ट्रेंडसाठी जसे अधिक परताव्यासाठी आसूसलेले गुंतवणूकदार जबाबदार होते; तसेच काही प्रमाणात नवउद्योजकही होते.

केवळ व्हॅल्यूएशन मोठे दाखवून, प्रसंगी मॅनेज करून, फंडिंग घेणे आणि कालांतराने गाशा गुंडाळणे अशा प्रवृत्ती स्टार्ट-अप क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सक्रीय होत्या.

आता अनेकांचे डोळे उघडले असून, ज्या स्टार्ट-अपकडे ग्राहकवर्गासह चांगले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे आणि ज्या कंपन्या नफा कमावू शकत आहेत, अशाच स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करण्याकडे इन्व्हेस्टरचा कल आहे. गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन बदलल्यामुळे अनेक सकारात्मक बदल झाले आहेत.

केवळ पैशाच्या आणि मार्केटिंगच्या जोरावर, किंवा ‘स्टार फाउंडर’च्या नावाने बाजारपेठ काबीज करणाऱ्या स्टार्ट-अपच्या तुलनेत आता छोट्या स्टार्ट-अपसाठीही संधी निर्माण झाली आहे.

तुलनेने बड्या स्टार्ट-अपलाही या काळात पुनर्रचना करून आपल्या व्यवसायाच्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळाली आहे.

start-up in india and pune
Start Managing Money : पहिल्या पगारापासूनच पैशांचं व्यवस्थापन सुरू करा, तुम्ही कुठे आणि कशी गुंतवणूक करू शकता ते जाणून घ्या

पुण्यातील स्टार्ट-अपची बाजी

स्टार्ट-अपला २०२३ मध्ये वास्तवाची जाणीव करून दिली असली, तरी २०२४ मध्ये परिस्थितीत सकारात्मक सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांचा म्हणजे २०१४ पासून पुढे पाहिल्यास पुण्यामध्ये ३५५ डीलद्वारे स्टार्ट-अपने तब्बल ४० हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक खेचून आणली आहे.

२०२३ मध्येही ‘एक्स्प्रेसबीज’ या ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स कंपनीने सुमारे ६५० कोटी रुपयांचे फंडिंग मिळविले आहे. पुण्यातील सुमारे दहा स्टार्ट-अपपैकी फर्स्ट क्राय (ब्रेनबीझ्) ही कंपनी २०२४ मध्ये ‘आयपीओ’चा विचार करत आहे.

फिनटेक क्षेत्राला काही प्रमाणात फटका बसला असला, तरी याच क्षेत्रातील अनेक कंपन्या नजिकच्या भविष्यात ‘आयपीओ’ घेऊन येतील, असे सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे.

भारतातील स्टार्ट-अप २०२३

एकूण फंडिंगः ९८० स्टार्ट-अपने मिळविली ९२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
पोर्टफोलिओ स्टार्ट-अपमधून ‘एक्झिट’ घेतलेले भारतीय गुंतवणूकदारः ५६ टक्के
‘एक्झिट’ घेत दोन ते पाच पट परतावा मिळालेले गुंतवणूकदारः ३३ टक्के
मर्जर-अॅक्विझिशन डीलः १४५
ई-कॉमर्सः
१६७ स्टार्ट-अपमध्ये २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
स्टार्ट-अपच्या सुरवातीच्या म्हणजे प्री-सीड, सीड स्टेजमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली.

(लेखक स्टार्टअप व डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी सल्लागार आहेत. मोबाईलः ९०११०४३१२२ )

---------

start-up in india and pune
Start up : भरडधान्याची सातासमुद्रापार भरारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.