डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
फेब्रुवारीमध्ये तरुणाईला वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाईन डे’चे. आपल्याला प्रिय व्यक्तीला आवडेल असे, अविस्मरणीय असे गिफ्ट देण्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते.
‘हटके’ गिफ्ट देताना दीर्घकाल उपयोगी ठरेल, अशा आर्थिक भेटीचा विचारही करता येऊ शकतो. त्याविषयी हे विचारमंथन...
व्हॅलेंटाईन दिवशी अनिकेतला त्याच्या मैत्रिणीला काहीतरी ‘हटके’ गिफ्ट द्यायची इच्छा आहे. नेहमीच्या गिफ्टचं आयुष्य एखाद्या दिवसासाठीच असतं, त्यामुळे असं गिफ्ट देण्यात त्याला रस नव्हता. त्याऐवजी एखादी आर्थिक भेट द्यावी, असा विचार त्याच्या मनात येत होता; पण केवळ रोख रक्कम भेट देणंदेखील त्याच्या मनाला पटत नव्हतं.
असं कोणतं ‘फायनान्शिअल गिफ्ट’ तिला देता येईल, की जे तिच्यासोबत अनेक वर्ष राहील आणि ज्याचा फायदा तिला भविष्यातसुद्धा होत राहिल, याचा त्यानं खूप विचार केला, त्याला काही ते सुचेना. शेवटी त्यासाठी त्याने त्याच्या शिक्षकांना फोन केला. शिक्षकांनी ‘इन्व्हेस्टमेंट क्लासरूम’मध्ये अनिकेतला काय सल्ला दिला ते बघु या...
अनिकेत : हॅलो सर, अनिकेत बोलतोय.
शिक्षक : बोल अनिकेत! आज अचानक कसा काय फोन केलास?
अनिकेत : सर, मला तुमचा एका महत्त्वाच्या मुद्यावर सल्ला हवा होता. खरंतर, मी प्रत्यक्षच भेटायला येणार होतो; पण माझी नोकरी नवी असल्याने रजा मिळणं थोडं अवघड आहे. म्हणून सुट्टीच्या दिवशी तुम्हाला फोन केला आहे. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं?
शिक्षक : नाही, काही अडचण नाही. सुट्टी असल्यानं मी निवांत बसलो होतो. बोल, तुला काय सल्ला हवा आहे? आणि आधी मला सांग तुझी नोकरी कशी सुरू आहे?
अनिकेत : सर, नोकरी एकदम मस्त सुरू आहे; पण अजूनही कॉलेजच्या दिवसांची आठवण येते.
शिक्षक (हसत) : अरे वा! तुझं बोलणं ऐकून खूप छान वाटलं. बोल, तुला कसला सल्ला हवा आहे?
अनिकेत : सर, येत्या १४ फेब्रुवारीला... मी... म्हणजे मला... एक गिफ्ट घेणार आहे... म्हणजे सॉरी... एक गिफ्ट देणार आहे... त्याविषयी...
शिक्षक (मोठ्याने हसत) : अरे, असा एकदम गोंधळलास का? तुला १४ फेब्रुवारीला तुझ्या मैत्रिणीला ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’ द्यायचं आहे ना?
अनिकेत : सर, तुम्ही कसं ओळखलंत?
शिक्षक : ते जाऊ दे ! मला पटकन सांग, की तुला काय सल्ला हवा आहे. आपण फोनवर बोलतोय, त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्यात उगाच फोनचं बिल नको वाढवायला!
अनिकेत (हसत) : हो सर! मला माझ्या मैत्रिणीला ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी असं काहीतरी ‘फायनान्शिअल गिफ्ट’ द्यायचे आहे, जे तिला अनेक वर्षं उपयोगी ठरेल. फक्त एका दिवसात संपून जाणारं गिफ्ट मला द्यायचं नाही.
शिक्षक : अगदी बरोबर विचार केला आहेस तू! आपण कोणालाही एखादी भेटवस्तू देतो तेव्हा हा विचार नक्की करावा. शुभेच्छापत्र, फुलं किंवा एखादी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करणं यामागील भावना नक्कीच खूप चांगल्या असतात; पण अशा भेटवस्तू अगदी तात्पुरत्या असतात.
म्हणूनच आपण देत असलेली भेटवस्तू अशी द्यावी, की ज्याचा उपयोग आयुष्यभरासाठी होईल. असे ‘फायनान्शिअल गिफ्ट’ देण्यासाठी फार मोठी रक्कम लागत नाही. तुला मी असे तीन पर्याय सांगतो.
अनिकेत : प्लीज, सांगा सर! मी लिहून घेतोय...
शिक्षक : तू दिलेले गिफ्ट तिच्या आठवणीत दीर्घकाळासाठी राहावे असे तुला वाटत असेल, तर असं गिफ्ट दिलं पाहिजे ज्याचा फायदा तिला नियमितपणे मिळत राहील. त्यासाठी पहिला पर्याय म्हणजे बँकेत खाते सुरू करणे.
तुझ्या मैत्रिणीचे बँकेत खाते नसेल, तर ‘व्हॅलेंटाईन डे’ला तू तिला बँकेत बचत खाते सुरू करून देऊ शकतो. आजकाल काही बँका बचत खात्यावर इतर बँकांपेक्षा अधिक दराने व्याज देतात. अशा बँकेत खाते सुरू करून दिलेस, तर तुझ्या मैत्रिणीला आयुष्यभर लक्षात राहील, असे गिफ्ट देण्याचा तुझा उद्देश साध्य होईल.
तुझ्या मैत्रिणीचे आधीपासूनच बचत खाते असेल, तर तू त्या खात्याला जोडून ‘रिकरिंग डिपॉझिट’ सुरू करून देऊ शकतोस. बचत खात्यातून त्या रिकरिंग डिपॉझिट खात्याला दर महिन्याला ठराविक तारखेला तुम्ही ठरवून दिलेली रक्कम ट्रान्स्फर केली जाईल.
रिकरिंग खात्याची मुदत एक वर्षाची ठेवल्यास पुढील वर्षी बरोबर ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी तुझ्या मैत्रिणीला त्यातील रक्कम व्याजासह मिळेल. रिकरिंग डिपॉझिटवर आकर्षक व्याज देणाऱ्या काही बँका आहेत. इंटरनेटवर तुला त्याची माहिती मिळेल.
अनिकेत : थँक्स सर! मी अशा बँकांची नावे शोधून काढेन. सर, तिसरा पर्याय काय आहे गिफ्ट देण्यासाठी?
शिक्षक : तू तुझ्या मैत्रिणीला एखाद्या चांगल्या डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ सुरू करून देऊ शकतोस. ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी ‘एसआयपी’चा पहिला हप्ता भरून तू या गुंतवणुकीचा शुभारंभ करू शकतोस.
दरमहा कमीतकमी पाचशे रुपये जमा करून ही गुंतवणूक करता येते. काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी, तर दरमहा फक्त शंभर रुपये जमा करून ही गुंतवणूक सुरू करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
अशी ‘एसआयपी’ करताना गुंतवणूक कालावधी कमीतकमी सात ते दहा वर्षांचा ठेव. त्याचा उत्तम फायदा मिळेल. इथून पुढे प्रत्येक वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी त्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा आढावा घ्यायला हवा.
अनिकेत : सर, तुम्ही सुचवलेला म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’चा हा पर्याय, तर खूपच आकर्षक आहे. मी यावर नक्कीच विचार करेन.
शिक्षक : आणखी एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. तुझी इच्छा असेल, तर सुचवू का?
अनिकेत : प्लीज, सर!
शिक्षक : मला खात्री आहे, की तुझ्या मैत्रिणीला सोन्याचे दागिने नक्कीच आवडत असतील; पण त्यात एक छोटा मुद्दा असा आहे, की सोन्याच्या दागिन्यांची डिझाइन सतत बदलत असते, त्यामुळे आज तयार केलेला दागिना भविष्यातदेखील तेवढाच आवडेल याची खात्री देता येत नाही.
अनिकेत : अगदी बरोबर बोललात सर!
शिक्षक : त्यावर उपाय म्हणजे गोल्ड फंडामध्ये गुंतवणूक करावी. ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी तू तुझ्या मैत्रिणीला अशा गोल्ड फंडाची गुंतवणूक सुरू करून देऊ शकतोस. तिची इच्छा असेल, तर भविष्यात त्याच फंडात ती ‘एसआयपी’द्वारे नियमित गुंतवणूक करू शकते.
ज्यावेळी तिला सोन्याचे दागिने करायचे असतील, त्यावेळी त्या फंडातील गुंतवणुकीची बाजारभावाप्रमाणे विक्री करून त्यातून ती हव्या असलेल्या डिझाइनचे दागिने करून घेऊ शकते.
अनिकेत : खूपच मस्त ! सर, हा पर्याय तर सर्वांत मस्त आहे.
शिक्षक (हसत) : मी सुचवलेले तीनही पर्याय तुला आवडले आहेत आणि ते सर्वच तू तुझ्या मैत्रिणीला ‘गिफ्ट’ देशील, असं मला वाटतंय.
अनिकेत (मोठ्याने हसत) : हो सर! मलासुद्धा तसंच वाटतंय !
शिक्षक : ऑल द बेस्ट!
अनिकेत : थँक्स अ लॉट सर! सर, तुम्ही सुचवलेल्या पर्यायांचा मी अभ्यास करतो. त्यात काही अडचण आली, तर तुम्हाला फोन करेन, चालेल ना?
शिक्षक : अवश्य फोन कर! ऑल द बेस्ट फॉर युवर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन!
(लेखक गुंतवणूक विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. मोबाईल ९२२५५११६७४)
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.