नंदिनी वैद्य
nandineevaidya@yahoo.com
जानेवारी महिन्यात अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम पुन्हा एकदा थाटामाटात विराजमान झाले, त्यामुळे देशात सगळीकडेच उत्साहाचे वातावरण भरून राहिले आहे.
हा उत्साह शेअर बाजारातदेखील पुरेपूर दिसत आहे. आता फेब्रुवारी महिन्यातदेखील हा उत्साह कायम आहे.
या महिन्यातदेखील विविध सणांबरोबर सूर्याच्या संक्रमणाचा काळ असल्याने रथसप्तमीचा सणही साजरा होत आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने या सणांचे औचित्य काय आहे, हे या लेखातून विशद करण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येत जानेवारीत झालेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशात सगळीकडेच अगदी उत्साहाचे वातावरण भरून राहिले आहे. या उत्सवाचे वेगळेपण असे, की जात, पंथ, वंश हे सारे विसरून संपूर्ण देश श्रीराममय झाला आहे.
प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल, तर अशक्यप्राय गोष्टी कशा सिद्ध होत जातात हे सारे देशवासीय बघत आहेत आणि या सगळ्याचीच दखल किंवा परिपाक म्हणावा, तर अक्षरशः दिवाळीनंतरच्या दोन महिन्यांतच पुन्हा दिवाळी साजरी झाली.
हा सारा उत्साह साहजिकच शेअर बाजारातदेखील पुरेपूर दिसत आहे. देशातील वातावरण, तर खरेच इतके आनंदी, प्रसन्न, सात्विक झाले होते, की खरोखरच प्रभू श्रीराम वनवासातून १४ वर्षांनी अयोध्येत परत आल्याने कसे वातावरण झाले असेल, याची कल्पना यावी.
आता फेब्रुवारी महिन्यातही व्हॅलेंटाईन डे, शिवरात्र, श्री गणेश जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुरूपुष्यामृतयोग, रथसप्तमी असे विविध सण, उत्सव आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा सूर्याच्या संक्रमणाचा काळ आहे.
येत्या १६ तारखेला रथसप्तमी साजरी होत आहे. मराठी महिन्यानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. हा सण म्हणजे सूर्य जयंती, ज्याला अचला सप्तमी, विधान सप्तमी आणि आरोग्य सप्तमी असेही म्हणतात.
हिंदू पौराणिक कथेनुसार, रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवांनी संपूर्ण जगाला ज्ञान देण्यास सुरुवात केली. या दिवशी भगवान सूर्याने संपूर्ण जगाला आपल्या ऊर्जेने प्रकाशित केले. हा दिवस सूर्याची जयंती मानली जाते.
रथसप्तमी दान-पुण्य कार्यासाठी शुभ मानली जाते. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो.
केवळ त्या सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तीभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
आता एकूण रथसप्तमी किंवा सूर्य जयंतीचा विचार आपण इथे का करत आहोत, असा प्रश्न ‘सकाळ मनी’च्या सर्व वाचकांना नक्कीच पडला असेल, आपले सर्व विषय हे अर्थविषयक असतात, तर हा आध्यात्मिक, पौराणिक विषय येथे का? त्याचीच उकल आपण करू या.
आपल्या हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, की प्रत्येक सण, उत्सव व्यक्तीला एक अधिक चांगली व्यक्ती म्हणून पुढे नेण्यास मदत करतो.
जसे, की वटपौर्णिमा, वसूबारस, नागपंचमी, बैलपोळा, दिव्याची दिवाळी असेल; प्रत्येक सणात आपण निसर्गाबद्दल, प्राण्यांबद्दल, वस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. त्याच अनुषंगाने रथसप्तमीमध्ये सूर्याबद्दल कृतज्ञता दाखविणे, त्याच्या अस्तित्वाची दखल घेणे अपेक्षित असते.
एक चांगला गुंतवणूकदार होण्यासाठी तो व्यक्ती म्हणून चांगला असणे अतिआवश्यक असते. यामुळे रथसप्तमीच्या निमित्ताने एका गुंतवणूकदारासाठी काय पाठ मिळू शकतात, हे जाणून घेऊ या.
रथसप्तमीची पुराणकथा
पुराणकथांनुसार, रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव सात घोडे असलेल्या हिरेजडित सोन्याच्या रथावर स्वार होतात. ‘सात घोड्यांचा रथ’ म्हणून रथसप्तमी असे नाव या दिवसाला पडले आहे.
सूर्यदेवाच्या या रथाचे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात, तर रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात.
सूर्याचे भ्रमण उत्तरायणात होत असल्याचेही रथसप्तमीवरून सूचित होते. उत्तरायणात सूर्य उत्तरेकडे कललेला असतो. ‘श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवत आहेत’ असे रथसप्तमीचे चित्रण केले जाते.
रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी कापणीचा दिवस आहे आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणारे तापमान आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.
सूर्य हा जीवनाचा मूळ स्त्रोत आहे. सूर्यकिरण शरीरासाठी आवश्यक असलेले ‘व्हिटॅमिन डी’ प्रदान करतात. वेळेचे मापन सूर्यावर अवलंबून असते.
हिंदू धर्मात सूर्य उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सूर्याला अंधाराचा नाश करून जगाला प्रकाशित करण्याची शक्ती प्राप्त होते, असे म्हटले जाते. (पूजेमुळे मूर्ती जशी जागृत होते, हे तसेच आहे)
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार रवी (म्हणजे सूर्य) हा आत्माकार आहे. मानवी शरीरातील जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चेतनाशक्ती रवीद्वारे साकार होते, हा त्याचा अर्थ आहे.
एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी प्राणशक्ती आणि प्रतिकारशक्ती चांगली असेल. रवी हा सत्ता, अधिकार, कठोरता, तत्त्वनिष्ठता, कृती, आदर, कीर्ती, आरोग्य, औषध आदींचा कारक आहे.
रथसप्तमीला सूर्यनमस्कार का?
रथसप्तमीच्या दिवशी, भौतिक शरीराला सूर्यासमोर आणणे शरीर आणि मनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सूर्यनमस्कार, हा सूर्याला नमस्कार करणाऱ्या १२ आसनांचा संच हा आपल्या भौतिक शरीराला सौरचक्राशी जोडण्यासाठी एक उत्तम सराव आहे.
रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करण्याची पद्धत म्हणजे सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सूर्यदेवाची १२ नावे घेऊन किमान १२ सूर्यनमस्कार घालावेत.
रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती बनवून सूर्यनारायणाची पूजा करावी. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून सूर्याची प्रार्थना करावी आणि दररोज सूर्यनमस्कार घालावेत. यामुळे आरोग्य चांगले राहाते.
भारतीय तिथीनुसार माघ महिन्यातील रथसप्तमी (शुक्ल सप्तमी दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिवसही साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयानंतर सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.
सूर्य म्हणजे नियमितता, सूर्य म्हणजे शिस्त, सूर्य म्हणजे उन्हाळ्यातील प्रखरता, हिवाळ्यातील हवेहवेपणा आणि पावसाळ्यात तो नसल्याने वातावरणात येणारी एक निराश भावना, सूर्य म्हणजे कर्मफलाची आसक्ती न ठेवता केलेले काम, पालक नसलेले छोटे बाळ जगेल; पण सूर्य नसेल, तर ही सृष्टीच नसेल इतके त्याचे आपल्या जीवनात अढळ स्थान आहे.
एवढे महत्त्व असून, तो त्याच्या वेळेला उगवतो आणि त्याच्या वेळेला मावळतो. श्रेयासाठीची कोणतीच केविलवाणी धडपड, गडबड त्याच्याकडे नाही म्हणून तो स्थिर आहे, स्थितप्रज्ञ आहे.
‘पिंडी ते ब्रह्मांडी’ची प्रचिती
‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या म्हणीची इथे आठवण येते. कुटुंबव्यवस्था ही एका राष्ट्राचे छोटे रूप असते.
ज्या राष्ट्राची कुटुंब जितकी सुखी त्या मानाने राष्ट्र सुखी असे आपण म्हणतो अथवा एखादी व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनात जबाबदारीने वागत असेल, तर समाजातदेखील ती शिस्तीने वा जबाबदारीने वागण्याची शक्यता खूप अधिक असते किंवा असेही म्हणता येईल, की सारी सृष्टी एका नियमाने चालते तिथे कोणताच बेशिस्तपणा नसतो.
परंतु, याच सृष्टीचा भाग असणारा मानव मात्र जेव्हा बेशिस्तीने वागायला लागतो तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम नक्कीच दिसायला लागतात व त्याला ते झेलावेच लागतात. या अर्थाने ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हा नियम.
या संदर्भाने बोलावयाचे झाले, तर सूर्य ब्रह्मांड व्यापून आहे; पण वर उद्धृत केलेले त्याचे सर्व गुण आपण आपल्या वैयक्तिक जीवनात अमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागलो, तर जीवन खरच किती सहज, सुंदर आणि समाधानी होईल आणि जेव्हा अशी समाधानी व्यक्ती असेल, तर साहजिकच एक गुंतवणूकदार म्हणूनही चांगले काम करू शकेल.
यशस्वी गुंतवणूकदाराच्या गुणांचे अवलोकन
आपल्या मासिकाचा मुख्य उद्देश चांगले गुंतवणूकदार घडविणे हा असल्याने सूर्यदेवाचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही यशस्वी गुंतवणूकदाराच्या गुणांचे अवलोकन केले, तर हेच आढळून येईल की खरोखरच सूर्याचे वर्णन केलेले बरेचसे गुण त्यांच्यात आढळून येतात.
शिस्त, न बोलता खूप मोठे काम करण्याची वृत्ती, नियमितपणा, सातत्य, आळसाचा अभाव, अहंकाररहित साधे-सरळ वर्तन, आयुष्यात कृत्रिमतेचा अभाव, आवश्यक तितकेच बोलणे असे गुण आपल्याला राधाकिशन दमाणी, विजय केडिया, वॉरेन बफेट अशा यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये पुरेपूर बघावयास मिळतात.
जसे सूर्याचे आपल्या जीवनचक्रातील स्थान अबाधित आहे, तसे एखाद्याला निरोगी जीवन जगायचे असेल, तर दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश असणे अति महत्त्वाचे ठरते. म्हणतात ना ‘health is wealth’ पैसे मिळवण्याबरोबर आपली तब्येत उत्तम असेल, तर भविष्यात होणारा आरोग्य खर्च कित्येक पटीने कमी होईल.
‘Healthy Mind in a Healthy Body’ ही संकल्पना आजच्या काळात मोठे अग्निदिव्य झाले आहे. आधुनिक जीवनशैलीचे अनेक नकारात्मक परिणाम तरुण पिढी भोगायला लागली आहे.
अशा वेळी खरोखरच सूर्यनमस्कारासारखा प्रभावी उपचार नसेल. सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. यातील आसनांमुळे आयुष्य, बल आणि बुद्धीचा विकास होतो.
मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुडघे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो; तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकारही नाहीसे होतात.
क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्याप्रमाणात संचार होतो. सूर्यनमस्काराने येणारी चपळता, शक्ती, चिवटपणा, मनाची ताकद आणि समतोल याच सर्व गोष्टी एका सजग, सुजाण आणि प्रगल्भ गुंतवणूकदार होण्यासाठी गरजेच्या ठरतात.
तात्पर्य काय?
मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू झाले, थोडक्यात त्याचे संक्रमण (TRANSITION- a change from one state or form to another) सुरू झाले.
रथसप्तमीला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल, अशावेळी सर्व गुंतवणूकदारांमध्येदेखील संक्रमण होऊन अपरिपक्वतेतून अधिकाधिक प्रामाणिकपणा, गंभीरता, दूरदर्शीपणा आपल्यात यावा, सूर्याचे गुण आपल्यात अंतर्भूत व्हावेत, हीच त्या सूर्यादेवाकडे प्रार्थना !!
(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. मोबाईल ७३५००१६७५७)
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.