पुणे: परवा माझ्या ऑफिसमध्ये ‘फ्री मेडिकल चेकअप’ होते म्हणून सर्वांसोबत मी देखील मेडिकल चेकअप करून घेतले. मी आयटीमध्ये काम करत असल्याने अशा ऍक्टिव्हिटी आमच्या ऑफिसमध्ये मधून अधून होत असतात. मी ते चेकअप केले आणि विसरूनही गेलो. मग अचानक दोन दिवसांनी मेलवर रिपोर्ट्स आले आणि मी सहज ते चाळले. तेव्हा माझी शुगर काठावर, थायरॉईड काठावर आणि कोलेस्ट्रॉल हाय आलेले होते.. खरं तर मी अंगकाठीने खूप बारीक.. उलट मला तुम्ही वजन वाढवा म्हणून लोक सल्ले देत असतात आणि त्यात हे असे रिपोर्ट पाहून मी उडालोच. ३९ वर्षीय वैभव आपल्या ४० शी च्या अनुभवाबद्दल सांगत होते.
वैभव म्हणाले, मी जेव्हा हे माझे रिपोर्ट जेव्हा घरी दाखवले तेव्हा घरच्यांना देखील आश्चर्य वाटले. पण आमचा त्या रिपोर्ट्सवर विश्वास बसत नव्हता. कारण मी बाहेरचे सहसा खात नाही तसेच आठवड्यातून एकदा मी क्रिकेट खेळतो. तसेच मला कोणतीही व्यसने आहेत असेही म्हणता येणार नाही. पण तरीही माझ्या पत्नीच्या आग्रहाखातर मी याच टेस्ट पुन्हा एकदा माझ्या विश्वासू लॅबमधून केल्या. आणि खरोखरच मला हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत याची खात्री झाली.
मी जेव्हा माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो त्यावेळी ते म्हणाले... आता तुम्ही चाळीशीत येताय..
वयाच्या चाळीशीत शरीरात खरंच इतके बदल होतात का? मला खरोखरच याची काहीच माहिती नव्हती.. आतापर्यंत मी स्वतःला फिट अँड फाईन समजत होतो.
'नेचर' या जर्नलमध्ये नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये तुम्ही कितीही व्यायाम केला किंवा फिट राहण्यासाठी प्रयत्न केले तरीही वय ही गोष्ट तुमच्यावर शारीरिक मर्यादा आणते ही गोष्ट सिद्ध झाली आहे.
या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की, वयाच्या कोणत्या टप्प्यात हे बदल सर्वाधिक होतात? संशोधनात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे? वृद्धत्व आणि आजार याचा संबंध आहे का? आणि वैभव सारख्या व्यक्तींना आता हे आव्हान पेलणे शक्य होईल का?