युगांक गोयल, सहयोगी प्राध्यापक, ‘फ्लेम’ विद्यापीठ संचालक, ‘सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ह’
श्रेयस रामकुमार, विद्यार्थी
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांनी राज्याच्या राजकारणाची भावी दिशा स्पष्ट होणार आहे. या महत्त्वाच्या राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकांत प्रमुख पक्षांना मिळालेले मतांचे प्रमाण, त्यांनी जिंकलेल्या जागा आणि त्यांना मिळालेले मताधिक्य अशा स्वरुपातील कामगिरीचा घेतलेला आलेखात्मक आढावा...
येत्या चार दिवसांतच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. ही खूप महत्त्वाची राजकीय घडामोड ठरणार आहे. महाराष्ट्रात मतदारांची संख्या ९.७ कोटी आहे. हे प्रमाण इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के, तर पोर्तुगालच्या लोकसंख्येच्या दहापट अधिक आहे. अन्य लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत भारतात निवडणुकीला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झालेले दिसते.
या निवडणुका केवळ मतदारांच्या लक्षणीय संख्येमुळेच नाही तर त्यातील स्पर्धेच्या चुरशीच्या स्वरूपामुळेही महत्त्वाच्या ठरतात. महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणुकांनंतर आतापर्यंत अनेक अर्थांनी अभूतपूर्व आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. राजकीय निष्ठांमध्येही टोकाचे बदल झाले आहेत. २०१९ पासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे अनेक मतदार नाराजही झालेले आहेत.