प्रमाणाबाहेर संख्या वाढल्याने तब्बल दहा हजार घोड्यांची कत्तल करण्याचे ‘नियोजन’ या देशाने केले आहे. पण या निर्णयावर जगभरच्या प्राणीप्रेमी, अभ्यासक, मानवतावाद्यांनी आक्षेप घेतला आहे, टीकेची झोड उठविली आहे. तरी सरकार काही नमते घेण्यास तयार नाही.
दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलिया हा खंडप्राय देश आहे. कांगारु या प्राण्याचे वास्तव्यही आॅस्ट्रेलियात आहे. देशाचा एक मोठा भूभाग वाळवंटाने व्यापलेला असला तरी प्राणी आणि वनस्पतींचे वैविध्यही आढळून येते. पण उंट आणि घोडे हे प्राणी येथील मूळचे नाहीत. हा देश एकेकाळी इंग्लंडची वसाहत होता. ब्रिटिशांनी वसाहतीच्या काळात आपल्या प्रवास, सामान आणि इतर कामासाठी उंट आणि घोडे आणले. हे दोन्ही प्राणी येथील पर्यावरणाशी एकजीव होऊन गेले. बऱ्यापैकी अनुकूल परिस्थिती लाभल्यामुळे उंट आणि घोड्यांची संख्या वाढत गेली. ही संख्या इतकी वाढत गेली की, इतर जनावरांना अन्न, पाणी कमी पडू लागले. काही वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होते. मग सरकार अमर्याद वाढलेल्या या प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी कत्तल करते. काही वर्षापूर्वी उंटांची अशीच कत्तल करण्यात आली. आता वेळ आली आहे ती घोड्यांवर! (Australia plans to slaughter10,000 of horses)
आॅस्ट्रेलिया देशात आजघडीला २५ हजार जंगली, मोकाट घोडे आहेत. या घोड्यांना स्थानिक भाषेत ‘ब्रम्बी’ असे नाव आहे. २०१९ ला हवाई सर्वेक्षण केल्यानंतर २५ हजार हा आकडा समोर आला आहे. देशातील आल्पस राष्ट्रीय उद्यानाने हा सर्वे केला होता. अल्पाईन भागात या घोड्यांची संख्या एकवटली आहे. तसेच देशात इतरत्रही घोड्यांची संख्या दिसून येते. न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि आॅस्ट्रेलिया कॅपिटल टेरीटोरी या तीन राज्यांच्या सीमेवर अल्पाईन प्रदेश आहे. अल्पाईन भागात या जंगली, मोकाट घोड्यांची संख्या बेसुमार वाढली आहे.
या देशातील केवळ एका टक्का इतकाच भाग हा अल्पाईन प्रदेशाचा आहे. येथे जगात कोठेही आढळून न येणारे प्राणी आहेत, असे चार्लस स्टुर्ट विद्यापीठाचे डेव्हीड वॅटसन सांगतात. मग घोडा हा दुसऱ्या खंडातून आणलेला प्राणी आहे. त्यामुळे त्याचा कायम धोका इतर प्राण्याना असतो. या घोड्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचा स्थानिक पर्यावरणावर पडत आहे. लुप्त होण्याच्या सीमेवर असणाऱ्या प्राण्यांना तो धोका अधिकच वाढतो.