'चेटकिण' ठरविलेल्या छुटनी देवी यांना पद्मश्री मिळाला तेव्हा...
झारखंडमधील छुटनी देवी यांना पद्मश्री सन्मान मिळालेला आहे. चेटकीण संबोधून त्यांना चक्क घरातून व गावातून बाहेर हाकलण्यात आले होते. पण याच ६२ वर्षीय छुटनी महतो यांच्या नावासमोर आता पद्मश्री लावलं जात आहे. त्यांच्या जीवनात एक दिवस असा आला की घरच्यांनी त्यांनी चेटकीण म्हणून हिणवलेच नाही तर चक्क घरातून बाहेर घालून बेदखल केले होते.
Chhutni Mahto faught against evil practices)
घरातून बाहेर काढल्यानंतर त्या एका झाडाखाली अवघ्या आठ महिन्याच्या बाळासह राहिल्या. त्यावेळी त्यांच्या पतीनेही त्यांची साथ सोडली. पण आज त्या त्यांच्यासारख्याच असंख्य महिलांची ताकद बनल्या आहेत. त्या सरायकेला खरसावा जिल्ह्यातील बिरबांस पंचायत क्षेत्रातील भोलाडीह गावात राहत. तिथेच त्या असोसिएशन फॉर सोशल अँड ह्यूमन अव्हेरनेस (आशा) यांच्या सौजन्याने संचालित पुनर्वसन केंद्र चालवतात.
छुटनी यांच्या लग्नानंतर १६ वर्षांनी १९९५ मध्ये एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून गावाने त्यांना चेटकीण मानण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना विष्टा खायला देण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा गावकरी त्यांच्या हत्तेचा कट बनवत होते, तेव्हा त्या पतीला सोडून चारही मुलांना घेऊन गाव सोडून गेल्या. त्यानंतर तब्बल आठ महिने जंगलात राहिल्या, पण पोलिसांनीही मदत केली नाही. पण आता कोणीही कोणत्याही महिलेला चेटकीण मानू शकत नाही. कारण छुटणी यांनी अशा ७० पीडित महिलांचे संघटन केले आहे. ज्या महिला आता या वाईट प्रथेच्या विरोधात लढा देत आहेत.
गावात कोठेही महिलांबाबत अशी घटना घडल्याची माहिती मिळताच त्यांच्या संघटनेची टीम तिथे जाते. आरोपींना व अंधश्रद्धा पसरविणाऱ्या तांत्रिकाच्या विरोधात तक्रार दाखल करतात. त्यानंतर पीडित महिलेला आपल्याबरोबर घेऊन जातात. कायदेशीर कारवाई झाल्यानंतर त्या महिलेला घरी पाठविले जाते. आत्तापर्यंत त्यांनी सुमारे १०० महिलांना या वाईट व भयानक प्रकारापासून मुक्ती दिली आहे.
त्यांची संघटना आरोपींच्या विरोधात न्यायालयातही लढा देतात. पीडित महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा सन्मान आहे. आज गावात ग्रामस्थ एखाद्या महिलेला चेटकीण ठरविण्याअगोदर दहावेळा विचार करतात. छुटनी यांचा विवाह धनंजय महतो यांच्याबरोबर झाला. जेव्हा त्यांची भाभी गर्भवती झाली, तेव्हा छुटनी यांनी सांगितले की मुलगाच होणार. पण मुलगी झाली. एक दिवस ती आजारी पडली. तेव्हा घरातील लोकांनी छुटनी यांना चेटकीण म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. अशिक्षित असलेल्या छुटनी महतो यांना गावकऱ्यांनी विष्टा व मूत्र प्यायला लावले. झाडाला बांधून मारहाण केली व अर्धनग्न करून गावातून धिंड काढली. यावेळी छुटणी पळून माहेरी गेली. पण आज त्या दुर्बल व बेसहारा महिलांची सहारा बनली आहे. कुठल्याही महिलेला अशा पद्धतीने त्रास होत असल्याचे कळताच त्या आपल्या फौजफाट्यासह तिथे जातात व लोकांना सुरुवातीला समजवतात. ते मानले नाहीत तर त्यांना जेलमध्ये पाठवतात.
पंतप्रधानांचा फोन घेतला नाही
छुटणी सांगत होत्या, ‘‘पद्मश्री काय असतं हे मला माहीत नाही, पण ज्याअर्थी लागोपाठ फोन यायला लागले, तेव्हा कळलं की काही तरी मोठी गोष्ट आहे. सकाळी ११ वाजता पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. म्हणाले की तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे. मी म्हटलं आता माझ्याकडे वेळ नाही. एक तासांनी फोन करा. परत सव्वाबारा वाजता फोन आला. त्यांनी सांगितलं की तुमचे नाव व फोटो वर्तमानपत्रात व टिव्हीवर येणार. तेव्हापासून गावातले लोक खुश झाले. बाहेरून पुष्कळ फोन आले. तेव्हा कळलं काही तरी मोठी गोष्ट आहे.’’
मरेपर्यंत काम करणार
चेटकीन म्हणून मी बरंच काही भोगल आहे आणि ते विसरता येणार नाही. चार मुलांना घेऊन घर सोडावे लागले. जर खरोखरच मी चेटकीन असती तर माझ्यावर ज्यांनी अत्याचार केले त्यांना संपवून टाकलं असतं. पण चेटकीन वगैरे काही होत नाही. गावकऱ्यांनी जे अत्याचार केले त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पोलिस प्रशासनसुद्धा अशा लोकांविरुद्ध कारवाई करत नाही. पण मी अशा लोकांविरुद्ध आवाज उठविणार असून मरेपर्यंत त्यासाठी कार्यरत राहणार आहे, असे छुटणी यांनी सांगितले.