Save Elephant
Save Elephant E sakal

हत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर, संवर्धनाची गरज

आफ्रिकन बुश किंवा सवाना हत्ती, आफ्रिकन फॉरेस्ट हत्ती व आशियाई हत्ती अशा तीन जाती सध्या अस्तित्वात आहेत
Published on

बालवाडीत बाराखडी शिकत असताना 'ह' हत्तीचा हे मनात बिंबले. तेव्हापासून ओळख झालेल्या महाकाय पण शांत, माणसाळणाऱ्या हत्तीबद्दल प्रेम, कुतूहल वाटणे सहाजिकच आहे.
अनेक वर्षांपूर्वी शहरांमध्ये रस्त्यावर हत्ती फिरविण्यात येत असत. अनेक चित्रपटांमधून त्यांचे दर्शन होत असे. प्राणिसंग्रहालयात तर हत्तीच्या पिंजऱ्याभोवती मोठी गर्दी असते.
पण जगातील सर्वांत मोठा असणारा हा सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संघटनेच्या लाल यादीत हत्तीचा समावेश करण्यात आला आहे.

हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा सस्तन प्राणी आहे. आफ्रिकन बुश किंवा सवाना हत्ती, आफ्रिकन फॉरेस्ट हत्ती व आशियायी हत्ती अशा तीन जाती सध्या अस्तित्वात आहेत. आफ्रिकन हत्ती हे आशियायी हत्तीपेक्षा मोठे असतात. भलामोठा आकार, सोंड, सुपाएवढे कान, सुळके म्हणजे बाहेरील दात (हस्तिदंत), खांबासारखे पाय व जाड पण संवेदनशील त्वचा ही हत्तीची वैशिष्ट्ये आहेत.

अशा वैशिष्ट्यपूर्ण प्राण्याचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. आफ्रिकन हत्ती हे प्रामुख्याने सहारा वाळवंटाच्या प्रदेशात म्हणजेच पश्‍चिम - मध्य, व पूर्व दक्षिण आफ्रिकी देशांत आढळून येते. आशियायी हत्ती हे आशिया खंडातील दक्षिण, पूर्व व आग्नेय भागात आढळतात. आशियायी हत्तींमधील भारतीय हत्ती हे भारत, बांगलादेश, भूतान, बोर्निओ (ब्रुनेई दारुसलेम, मलेशिया, इंडोनेशिया), कंबोडिया, चीन, लावो पीडीआर, नेपाळ, श्रीलंका, थायलंड व व्हिएतनाम येथे दिसतात. सुमात्रन हत्ती हे सुमात्रा बेट तर श्रीलंकन हत्तींचा अधिवास श्रीलंकेच्या आग्नेय भागात आहे.

स्थलांतर
आफ्रिकन हत्ती हे उष्णकटिबंधीय जंगले, गवताळ प्रदेश अशा विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये राहतात, तर आशियाई हत्ती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वनात आढळतात. आशियाई व आफ्रिकन हत्ती दरवर्षी स्थलांतर करतात. त्यांचा स्थलांतराचा मार्ग साधारणपणे एकच असतो. हवामान व वातावरणाची स्थिती यावर त्यांच्या स्थलांतराचे अंतर वेगवेगळे असू शकते. आफ्रिकेतील दीर्घकालीन कोरड्या हवामानात तेथील हत्ती १०० किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याची नोंद आहे. पाण्याचे अनेक स्रोत उपलब्ध असलेल्या दक्षिण भारतातील पानगळीच्या जंगलातील आशियायी हत्तींचे स्थलांतर २० ते ५० किलोमीटर अंतरापर्यंत असते, असे अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

आफ्रिकी हत्ती हे साधारणपणे जून ते नोव्हेंबर या उन्हाळ्याच्या काळात असताना स्थलांतर करतात. नद्या व ज्यामधील पाणी आटणार नाही, अशा अन्य जलस्रोतांच्या जवळील ठिकाण ते अधिवासासाठी निवडतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते जून महिन्यांत हत्तींचे कळप पुन्हा मूळ वसतिस्थानी परततात. स्थलांतर हे उन्हाळ्याच्या काळात होत असल्याने अन्नाचा मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन मोठ्या कळपातून हत्ती कुटुंबासह वेगळ होतात. अशा कुटंबाच्या कळपाचे नेतृत्व हत्तीणी करतात. यामध्ये कळपाच्या पुढे एक हत्तीण व सर्वांत मागे दुसरी हत्तीण असते. त्यांच्या संरक्षणात युवा हत्ती प्रवास करतात. अशा कुटुंबात दोन ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त हत्ती असतात. कधीकधी हत्ती सामूहिक स्थलांतरही करतात. त्यावेळी एका कळपात हत्तींची संख्या ५०० पर्यंत असू शकते.

सामाजिक आयुष्य
अनेक हत्तींचे सामाजिक जीवन कळप आणि लहान गटांभोवती फिरते. हत्तींच्या कळपात अनेक हत्तीणी व पिले असतात. कळपासाठी अन्न व पाण्याचा शोध घेण्यास मदत करणे, शत्रू प्राण्यांना टाळणे व निवारा शोधणे याची जबाबदारी कर्त्या हत्तीणीकडे असते. तिच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने तिच्या ज्येष्ठ मुलीकडे येतो. साधारणतः एका कळपात दहा हत्ती असतात. जर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर कळपाचे विभाजन होते. काही हत्ती बाहेर पडून नवा अंशतः स्वतंत्र गट तयार करतात. या उलट नर हत्ती एकटेच फिरतात किंवा विशिष्ट वर्चस्व पदानुक्रमांसह गट तयार करतात. टंचाईच्या काळात किंवा धोका उद्भवल्यास नर हत्ती एकत्र जमण्याची शक्यता जास्त असते. विणीच्या काळातच ते मादीजवळ येतात.

वनसंपदेत महत्त्व
वन्य प्राण्यांसाठी जंगल व गवताळ प्रदेशातील परिसंस्था राखण्यास हत्तींची मदत होते. समृद्ध जैवविविधतेशी ते अविभाज्यपणे जोडलेले आहेत. जैववैविध्येतेचे ते रक्षणकर्ते आहेत. घनदाट जंगलातील अधिवासात त्यांनी तयार केलेल्या मार्गाचा वापर अन्य पशूही करतात. हत्तींच्या पायांचे ठसेही सूक्ष्म परिसंस्था अबाधित ठेवण्यास उपयुक्त ठरतात. या ठशांमुळे जमिनीवर तयार झालेल्या खोलगट भागात जेव्हा जेव्हा पाणी साचते तेव्हा तेथे लहान बेडूक आणि इतर जीवांसाठी निवारा उपलब्ध होतो.

वन्यप्राण्यांमधील प्रमुख प्रजाती म्हणून हत्ती जेथे राहतात त्या परिसंस्थेची जैवविविधता राखण्यात मदत करतात. मानवी जीवनातही हत्तींना अगदी राजे-रजवाड्यांच्या काळापासून महत्त्व आहे. हत्ती बाळगणे हे तालेवारपणाचे लक्षण समजले जात असते. पूर्वी अनेक राजांच्या पदरी हत्ती असत. राजवैभवाचे ते प्रमुख चिन्ह होते. युद्धातही हत्तीचा सहभाग महत्त्वाचा ठरे. मंदिरांमध्ये हत्तींना मानाचे स्थान असते. अगदी आताच्या काळातही केरळसारख्या राज्यात जंगलातील अनेक कामांसाठी माणसाळलेल्या हत्तींचा वापर केला जातो. लहानथोरांसाठी सर्कसमध्ये हत्तींचे खास आकर्षण असते.

लाल यादीत हत्ती
आफ्रिकन हत्तींची संख्या साधारणपणे चार लाख ते साडेसहा लाख आहे. आशियायी हत्तींची संख्या २५ हजार ६०० ते ३२ हजार ७५० आहे. आफ्रिकेतील हत्तींच्या दोन्ही जाती व आशियाई हत्तींच्या उपप्रजातींचा ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) ने धोक्याच्या लाल यादीत समावेश केला आहे. आशियायी हत्तींमध्ये भारतीय हत्तींची संख्या सर्वांत जास्त २० ते २५ हजार आहे. सुमात्रन व श्रीलंकन हत्ती ते अति धोकादायक गटात मोडतात सुमात्रन हत्ती हे सुमारे दोन हजार ४०० ते तीन हजार ३५० व श्रीलंकन हत्ती तीन हजार १६० ते चार हजार ४०० एवढेच शिल्लक आहेत. आशियायी हत्तींची उपप्रजाती बॅार्निओ हत्ती हे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांची संख्या केवळ एक हजार ते दीड हजार एवढीच आहे. आययूसीएनच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत दरवर्षी २० हजार हत्ती दातांसाठी (हस्तिदंत) मारले जातात. २००२ ते २०११ या काळात त्यांची संख्या ६२ टक्क्यांनी घटली. आफ्रिकन सवाना हत्तींची संख्या २००७ ते २० १४ याकाळात ३० टक्क्यांनी घटली

Save Elephant
Video : Yerawda Jail मधून सुटका झालेल्या कैद्यांचं 'प्रेरणापथने' कसं बसदललं आयुष्य ?

हत्तींना धोका
आफ्रिकन व आशियायी हत्तींची संख्या कमी होण्यास महत्त्वाचे कारण म्हणजे शिकार. हस्तिदंताच्या चोरट्या व्यापारासाठी आफ्रिकन हत्तींची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. अमेरिका, चीन, थायलंड आणि हाँगकाँगमध्ये हस्तिदंताची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बेकायदा व्यापाराला चालना मिळते. हत्तींच्या बचावासाठी या व्यापाराला पायबंद घालणे हाच सर्वांत प्रभावी व परिणामकारक उपाय असल्याचे निरीक्षण वर्ल्ड वाइड फंड (डब्लूडब्लूएफ)ने नोंदविले आहे. आफ्रिकेतील फॅारेस्ट व सवाना या दोन्ही प्रजातींच्या संवर्धनासाठी शिकारीवर पूर्णपणे बंदी आणून हत्तींना योग्य निवारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत ‘आययूसीएन’चे सरचिटणीस डॅा. ब्रुनो ओबेरल यांनी व्यक्त केले आहे. हत्तींच्या संख्येत होणारी घट थांबविण्यासाठी अनेक आफ्रिकी देशांनी पावले उचलली आहेत. हत्ती वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रयत्नांना यश
हत्तींच्या संवर्धनासाठी चोरट्या शिकारी रोखणे, कायद्याचे संरक्षण आणि अधिवासासाठी जमिनीसंदर्भातील समस्या दूर करून मानव हत्तींच्या सहअस्तित्वासाठी प्रयत्नांना फळ मिळत असल्याचे गबॅान आणि काँगो प्रजासत्ताकमधील फॅारेस्ट हत्तींच्या संख्येवरून दिसले आहे. अंगोला, बोस्टवाना, नामिबीया, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांमधील कवांगो आणि झांबेझी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या कवांगो झांबेझी ट्रान्सफ्रंटियर कॅान्झर्व्हेशन एरिया सवाना हत्तींची संख्या स्थिर होऊ लागली आहे.

आशियाई हत्तींना धोका
- आशियायी हत्तींना सर्वांत मोठा धोका अधिवासाचा आहे.
- वाढत्या मानवी वस्त्यांमुळे घनदाट जंगले आक्रसत चालल्याने हत्तींच्या हक्काचा निवारा नष्ट होत आहे.
- हत्ती व मानवातील संघर्षात हत्तींचा बळी जात आहे.
- हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे.
- रेल्वेखाली येऊन हत्तीच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
- वीजप्रवाहामुळेदेखील हत्तीचे सर्वाधिक मृत्यू होतात.

हत्ती संवर्धन मोहीम
भारतात हत्तींची घटती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने १९९२ मध्ये हत्ती संवर्धक मोहीम जाहीर केली. आशियायी वन्य हत्तींची संख्या वाढण्यासाठी राज्यांमधील वन व्यवस्थापनाने सुरू केलेल्या उपायांना आर्थिक व तांत्रिक मदत देणे हा यामागील हेतू आहे. हत्ती, त्यांचा अधिवास, स्थलांतर मार्ग यांचे संवर्धन करून नैसर्गिक अधिवासात हत्तींचे वास्तव्य दीर्घकालीन सुरक्षित हाही या मोहिमेचा उद्देश आहे. याशिवाय हत्तींचे पर्यावरणशास्त्र आणि व्यवस्थापन संशोधन, हत्तींच्या संवर्धनाबाबत स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करणे, पाळलेल्या हत्तींना आधुनिक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करणे हा या मोहिमेचा भाग आहे. हस्तिदंतासाठी होणाऱ्या शिकारींना प्रतिबंध घालण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...