Sending wrong Emoji consider as crime in india explained in Marathi
मुंबई : ती व्यक्ती माझी बॉस होती, प्रत्येक एक वाक्यासोबत एक ईमोजी जोडणे हा त्यांच्या सवयीचा भाग होता. अनेकदा त्या इमोजीसोबत 😘 किसची ईमोजीसुद्धा असे; मला ते ईमोजी कळायचे पण ते कोणत्या संदर्भाने तिथे वापरले आहेत हे समजायचं नाही. मला राग यायचा... वाटायचं या माणसाला आपण काय ईमोजी वापरतोय हे खरंच कळत नाही की हा मुद्दाहून असं वागतोय? एक मोठ्या पदावर काम करत असणारी स्नेहा तिला आलेल्या अनुभवाविषयी सांगत होती.
जनरेशन झेड मधली अक्षता म्हणाली, मला अनेकांनी अशा स्मायली पाठविल्या आहेत की, ज्यातून खरोखरच खूप चुकीचे अर्थ निघतात. जे खरं तर आमच्या पिढीतल्या लोकांना फार पक्के ठाऊक आहेत पण ज्यांनी पाठवले त्यांना नक्कीच माहित नसणार.. खूपदा खूप अनोळखी व्यक्तींकडून मला 'हग' 🤗 ची ईमोजी येते. तसेच चेहऱ्यावर तीन बदामाची जी ईमोजी 🥰 आहे ती खरे तर 'किस' ची ईमोजी आहे पण अनेक लोक सर्रास ती पाठवतात. या शिवाय अशा काही ईमोजी आहेत ज्यांचे अर्थ अश्लील आहेत पण त्याही आम्हाला अनेकांकडून येतात. माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांनी देखील अशा ईमोजी मला पाठविल्या आहेत.
सायली म्हणाली, मला एकदा मीटिंगला चला या मेसेजसोबतच किस 😘ची ईमोजी आली होती. ती म्हणाली, ते मध्यमवयीन सहकारी होते. मला शंका आली की हे चुकून झालं असावं. पण तरीही मी ही गोष्ट एचआरला सांगितली. त्यांनी संबंधित व्यक्तीला बोलावून तुमचं चुकलंय हेही सांगितलं. पण हा विषय फार पुढे गेला नाही कारण खरोखरच ते सहकारी फार टेक्नोसॅव्ही नसल्याने त्यांच्याकडून असे चुकून झाले होते.
या तीनही घटना ऑफिसमधल्याच. हल्ली प्रत्येकच ठिकाणी आपल्याला इमोजीने व्यक्त व्हायला जास्त आवडू लागले आहे. त्यात ऑफिससारखी प्रोफेशनल जागा देखील वर्ज्य नाही.. दिवसातून शेकडोवेळा आपण या इमोजीचा वापर या ना त्या मार्गाने करत असतोच. परंतु अनेकदा त्याचे अर्थ पुरेसे माहिती नसताना किंवा माहिती असूनही त्याच्या अर्थाची फारशी पर्वा न करता हे ईमोजी आपल्याकडून वापरले जातात. अनेकांना या इमोजी आणि त्यामागचे अश्लील अर्थ देखील व्यवस्थित ठाऊक असतात पण त्यांच्यासाठी हे एक साधन असते. पण ईमोजी हा देखील शब्दांप्रमाणेच जपून वापरण्याचा विषय आहे. खासकरून कामाच्या ठिकाणी. कारण एखादी चुकीची ईमोजीही तुम्हाला जेलपर्यंत नेऊ शकते..