गणपती ही देवता भारतापासून मेक्सिकोपर्यंत तसेच चीन व रशिया यासारख्या देव-धर्म न मानणाऱ्या राष्ट्रातही उपास्य देवता म्हणून होती, हे उत्खननात सापडणाऱ्या मंदिराच्या अवशेषातून व मूर्तीतून स्पष्ट दिसते. 31 ऑगस्टरोजी भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. जगभरातील काही प्रमुख शहरातील गणेशोत्सवाचे व गौरी पूजनाचे दिवस खालीलप्रमाणे...
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केलेला गणेशोत्सव आता केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यंदा 31 ऑगस्टरोजी भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. जगभरातील काही प्रमुख शहरातील गणेशोत्सवाचे व गौरी पूजनाचे दिवस, मुहूर्त सांगतायत पंचांगचे संचालक ओंकार दाते..
भारतात सर्वत्र गणपती व्यापून आहे. तमाशातही पहिला वग गणपतीचा म्हटला जातो. जुन्या घराच्या मुख्यदारावर गणेश चित्र असे. आता गणपतीची ‘टाइल्स’ असते. परंतु गणपती आहे. शिक्षणाला प्रारंभ होतो तो श्रीगणेशायनमः करूनच. सर्व शुभ कार्यात ‘प्रथम निर्विघ्नता सिद्ध्यर्थम्’ म्हणून गणपतीचेच स्मरण केले जाते. असे, इतके स्थान आपल्या जीवनात आपण गणपतीला स्थान दिले आहे. गणेशाचे उपासक जगभर पसरलेले दिसतात त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केलेला हा गणेशोत्सव आता केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असा हा सृष्टीच्या पूर्वीपासून आलेला गणपती देव आहे. ‘आविर्भूतंच सृष्ट्यादौ’ असे अथर्वशीर्षातच म्हटले आहे. असा हा सर्वांना प्रिय असणारा विश्ववंद्य गणपती आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा करतात. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. ‘सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना’ असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टि करण, वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत. गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवितात. या प्रसंगी त्याची दहा नावे गुंफलेला पुढील मंत्र म्हणून त्यास एकवीस दूर्वा अर्पण करतात.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदन्तेभवक्त्रे च तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।
गौरी (महालक्ष्मी) पूजन : भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही प्रांतात सप्तमीचे दिवशी आवाहन, अष्टमीला गौरी पूजन करून नवमीला विसर्जन केले जाते.
शाडूचे किंवा पितळी असे देवीचे दोन मुखवटे उभे करून किंवा सुगड/तांब्यावर ठेवून पूजन केले जाते. काही जणांकडे ५ खडे वाटीत ठेवून पूजन केले जाते.
यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा/कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते. तसेच काही जणांकडे भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा/कनिष्ठा लक्ष्मी भगिनींची पूजा केली जाते. ती नंतर १६ दिवस करावयाची असते आणि रोज १ दोरा पूजेत घ्यावयाचा असतो. मात्र सध्याच्या काळात ज्येष्ठा नक्षत्रावर १६ दिवसांचे प्रतीक म्हणून १६ गाठी मारलेला तातू पूजेत घेऊन नंतर तो दुसरे दिवशी हातात बांधतात.
या देवीची पूजा, कुलधर्म, कुलाचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते.
अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ताट दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. परंतु ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो. गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरीविसर्जन करून घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरून ठेवावे किंवा जलाशयात विसर्जन करावे.
गणेश स्थापना ३१ ऑगस्ट रोजी
दिनांक ३१ ऑगस्ट रोजी बुधवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी बुधवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४८ ते दुपारी १:५४ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते.
दिनांक ३ सप्टेंबर रोजी शनिवारी अनुराधा नक्षत्रावर दिवसभरात कधीही गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने दिनांक ४ सप्टेंबर रोजी रविवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक ५ सप्टेंबर रोजी सोमवारी रात्री ०८:०६ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.
यावर्षी दिनांक ९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी आहे. १० दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल.
पुढच्या वर्षी १९ सप्टेंबर २०२३ रोजी मंगळवारी श्रीगणेश चतुर्थी आहे.
जगभरातील काही प्रमुख शहरातील गणेशोत्सवाचे व गौरी पूजनाचे दिवस खालीलप्रमाणे
न्यूयॉर्क
गणेश चतुर्थी : ३० ऑगस्ट
गौरी आवाहन : २ सप्टेंबर दुपारी २.१७ नंतर
गौरी पूजन : ३ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ४ सप्टेंबर दुपारी १२.१३ नंतर
अनंत चतुर्दशी : ९ सप्टेंबर
फिनिक्स
गणेश चतुर्थी : ३० ऑगस्ट
गौरी आवाहन : २ सप्टेंबर सकाळी ११.१७ नंतर
गौरी पूजन : ३ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ४ सप्टेंबर सकाळी ९.१३ नंतर
अनंत चतुर्दशी : ८ सप्टेंबर
शिकागो
गणेश चतुर्थी : ३० ऑगस्ट
गौरी आवाहन : २ सप्टेंबर दुपारी १.१७ नंतर
गौरी पूजन : ३ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ४ सप्टेंबर दुपारी ११.१३ नंतर
अनंत चतुर्दशी : ८ सप्टेंबर
लॉस एन्जेलिस
गणेश चतुर्थी : ३० ऑगस्ट
गौरी आवाहन : २ सप्टेंबर सकाळी ११.१७ नंतर
गौरी पूजन : ३ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ४ सप्टेंबर सकाळी ९.१३ नंतर
अनंत चतुर्दशी : ८ सप्टेंबर
लंडन
गणेश चतुर्थी : ३० ऑगस्ट
गौरी आवाहन : ३ सप्टेंबर सायं. ६.२७ पर्यंत
गौरी पूजन : ४ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ५ सप्टेंबर दुपारी ३.३६ पर्यंत
अनंत चतुर्दशी : ९ सप्टेंबर
सिडने
गणेश चतुर्थी : ३१ ऑगस्ट
गौरी आवाहन : ३ सप्टेंबर
गौरी पूजन : ४ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ५ सप्टेंबर
अनंत चतुर्दशी : ९ सप्टेंबर
दुबई
गणेश चतुर्थी : ३१ ऑगस्ट
गौरी आवाहन : ३ सप्टेंबर
गौरी पूजन : ४ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ५ सप्टेंबर सायं. ६.३६ पर्यंत
अनंत चतुर्दशी : ९ सप्टेंबर
सिंगापूर
गणेश चतुर्थी : ३१ ऑगस्ट
गौरी आवाहन : ३ सप्टेंबर
गौरी पूजन : ४ सप्टेंबर
गौरी विसर्जन : ५ सप्टेंबर
अनंत चतुर्दशी : ९ सप्टेंबर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.