जागतिक तापमानवाढीनं सजीवसृष्टीसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केलाय. एकीकडं कार्बन उत्सर्जनाला चाप लावण्यासाठी जगभरातील राष्ट्रे फक्त निर्धाराचे विडे उचलत असताना दुसरीकडं निसर्गाच्या लहरीपणामुळं होणारं नुकसान कुणीच रोखताना दिसत नाही. कार्बन काजळीनं जगातील बहुतांश देशांची वाट लावली आहे. दक्षिणेकडील अंटार्क्टिका खंडाची स्थितीही फारशी वेगळी नाही. जगाचं क्लायमेट इंजिन असणारा हा हिमप्रदेश आता मानवी मोहिमा आणि संशोधन प्रकल्पामुळं आक्रसू लागला आहे. आता या हिमखंडाची जैवसाखळीच तुटण्याची भीती व्यक्त होते आहे. अंटार्क्टिकावरील सुक्ष्मजीवांचं जग मोठं विचित्र आहे. ते आता कुठं माणसाला थोडं समजू लागलं आहे. माणसानं त्यांच्या थेट संपर्कात येणं नव्या शोधांप्रमाणं आव्हानांना देखील जन्म देऊ शकतं.