तंत्रज्ञानापेक्षाही कामगार महत्त्वाचा; भारतातील स्थितीचं काय?
तंत्रज्ञान कोणतंही असो ते दुधारी तलवारीसारखं असतं, वापरणाऱ्याला त्याच्या दुष्परिणामांची माहिती नसेल तर त्याचे विपरित परिणाम हे ठरलेले असतात. कोरोनाच्या जागतिक महासाथीनं तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कैक पटीनं वाढविला असला तरी त्यामुळं अनेक मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत. तंत्रज्ञानाधारित उद्योगाचे मॉडेल स्वीकारणाऱ्या बहुतांश सर्वच क्षेत्रामध्ये ऑटोमेशनच्या प्रक्रियेनं वेग घेतला आहे. यामुळे उत्पादनाचा दर्जा वाढून खर्चामध्ये बचत होत असली तरीसुद्धा त्यामुळं जाणाऱ्या रोजगारांचा देखील गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आहे आहे. जागतिक ख्यातीच्या अर्थशास्त्रज्ञांनी आता याचबाबतीत सर्वच देशांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सरकारी यंत्रणांप्रमाणेच बड्या खासगी कंपन्यांनीही याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.
सावध ऐका पुढल्या हाका
मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये काम करणारे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॅरोन ऐसमोगलू यांनी विविध क्षेत्रात झपाट्यानं होत असलेलं ऑटोमेशन आणि त्याचे जनतेच्या आर्थिक स्वास्थ्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचा सखोलपणे अभ्यास केला आहे. जगातील बहुतांश गुंतवणूकदार अधिक परतावा देणाऱ्या टेक्नो कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असले तरीसुद्धा त्यामुळं निर्माण होणारी आर्थिक विषमता ही अधिक भयावह असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
केवळ अमेरिकेतील मागील चाळीस वर्षांचा विचार केला तरीसुद्धा कामगारांच्या वेतनमानामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत निर्माण झाल्याचे दिसून येते. पूर्वी कमी कौशल्यं असणारी मंडळी जी कामं करत होती ती बहुतांश कामं ही ऑटोमेशननं संपुष्टात आणल्याचं दिसतं.
जागतिकीकरणामुळं विविध कंपन्या आणि कारखान्यांमधील कामगार चळवळीचं अस्तित्व संपुष्टात आणलं असलं तरीसुद्धा रोजगारांमध्ये होणाऱ्या कपातीमागं मुख्य कारण हे ऑटोमेशन असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हा बदल काही अॅक्ट ऑफ गॉड आहे असं म्हणता येणार नाही तसंच त्याचं खापर निसर्गावर देखील फोडता येणार नाही. विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वतःहून या रस्त्याची निवड केली असून त्याचा मोठा फटका रोजगारनिर्मितीला बसला आहे. तंत्रज्ञानक्षेत्रातील ज्या बदलांच्या बळावर अमेरिकेनं आतापर्यंत ऐश्वर्य भोगलं तिथंच आता वेतन आणि उत्पन्नातील तफावत मोठ्याप्रमाणावर वाढत असल्यानं अर्थतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. कारण याचा संबंध केवळ अर्थकारणाशीच नाही तर त्याचे व्यापक आणि दूरगामी असे सामाजिक दुष्परिणाम देखील संभवतात. कालपरवापर्यंत सिलिकॉन व्हॅलीचं तोंडफाटेस्तोवर कौतुक करणारे अमेरिकेतील आघाडीचे टेक्नोक्रॅट आता तिच्यावरच टीकेचे प्रहार करताना दिसतात