मुंबई: घरपोच अन्नपदार्थ, किराणा सामान पोहोचवणारी स्विगी कंपनी नुकतीच शेअर बाजारात 'लिस्टेड कंपनी' झाली. म्हणजेच ही कंपनी आता प्रायव्हेट कंपनी राहिली नसून पब्लिक कंपनी झाली आहे. तुम्ही आम्ही कोणीही याचे शेअर्स घेत या कंपनीचा भाग बानू शकतो. दिवसागणिक अशा अनेक कंपन्या शेअर बाजारात उतरत असतात. त्यात नवल ते काय..? नवल नाहीच. पण स्विगीचे शेअर बाजारात आल्याचा सोहळा मात्र खऱ्या अर्थाने अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
स्विगीसाठी काम करणारे 'डिलिव्हरी पार्टनर्स' म्हणजे बोली भाषेत सांगायचे झाले तर 'डिलिव्हरी बॉय' किंवा 'डिलिव्हरी गर्ल'. स्वीगीच्या अधिकाऱ्यांसह या डिलिव्हरी पार्टनर्सच्या उपस्थितीत शेअर बाजाराची 'मानाची बेल' वाजविण्यात आली.
पण फक्त मानपान करून या गिगवर्कर्ससाठी खूप काही केले असे म्हणता येईल का? या डिलिव्हरी पार्टनर्सचे आभार मानण्यापलीकडे त्यांच्या प्रगतीसाठी या कंपन्या खरंच या कंपन्या काही करतायेत का?